जळगाव जिल्ह्यात हजारावर बोगस डॉक्टर
By admin | Published: December 27, 2016 01:10 AM2016-12-27T01:10:43+5:302016-12-27T01:10:43+5:30
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी न होता वाढतच असून, बिनबोभाटपणे वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. पदवीअभावी सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे
जळगाव : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या कमी न होता वाढतच असून, बिनबोभाटपणे वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. पदवीअभावी सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे, रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.
यंत्रणेच्या संगनमतामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. बोदवड व धरणगाव तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांना नागपूर येथील पोलीस पथकाने अटक केल्याने, हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भाग, तसेच इतर तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील अशिक्षितपणाचा फायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जात आहे. बोगस पदवी घेऊन छोट्या-मोठ्या गावात, वाड्या-वस्त्यांवर हे डॉक्टर दवाखाने थाटतात. त्यामुळे सध्या जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या हजारावर पोहोचली आहे. मुळात एवढे बोगस डॉक्टर आहेत, याची नोंदही नसते. आरोग्य विभागाकडे अद्यापही १०० ते १५० बोगस डॉक्टर असल्याचेच सांगितले जाते. (प्रतिनिधी)
बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नोंद नसते. त्याविषयी तक्रार आल्यानंतर, तालुकास्तरावर त्याची चौकशी करून कारवाई केली जाते.
- डॉ. बी.आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव