उल्हास, वैतरणा, सूर्या, तानसा, वसिष्ठी नद्यांची प्रदूषण पातळी धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:21 AM2019-11-30T04:21:08+5:302019-11-30T04:21:22+5:30
महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले, देशातील ३२३ नद्यांमध्ये एकूण ३५१ भागांत प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात ५३ नद्या महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा आणि वसिष्ठी या नद्यांचा समावेश आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील ताज्या आकडेवारीचा हवाला देऊन कटारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गोदावरी, काळू, कुंडलिका, मिठी, मोरना, मुळा, मुठा नीरा, वेल, भीमा, इंद्रायणी, पवना, वैनगंगा, वर्धा आणि घोड यांचा समावेश आहे. याशिवाय कन्हान, कोलार, कृष्णा, मोर, पाताळगंगा, पेठी, पैनगंगा, पूर्णा, तापी, उरमोडी, वेण्णा, वाघूर, बिंदूसरा, बोरी, चंद्रभागा, दारणा, गिरणा, हिवरा, कोयना, पेहलार, सीना, तितूर, अंबा, भातसा, गोमई, कान, मंजिरा, पंचगंगा, पंजारा, रंगावली या नद्याही कमालीच्या प्रदूषित आहेत.
एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कटारिया म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड प्रदूषण निगरानी समित्यांसोबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) निगरानी केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासत असते. सीपीसीबीच्या अहवालात पाण्यात जैव रासायनिक आॅक्सिजनच्या पातळीच्या आधारावर नद्यांमध्ये किती प्रदूषण आहे हे ठरते.
उपाययोजना सुरू
नमामि गंगे, राष्ट्रीय नदी संरक्षण योजना, अटल नविनीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन (अमृत), राष्ट्रीय जलीय पारिस्थिती प्रणालीच्या संरक्षण योजनेअंतर्गत (एनपीसीए) केंद्र सरकारकडून राज्य आणि शहरी शाखेला मदत दिली जाते.
कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रदूषित नदी खंड आसाम (४४), मध्य प्रदेश (२२), केरळ (२१), गुजरात (२०), ओडिशा (१९) आणि पश्चिम बंगालमध्ये (१७) आहेत.