‘तो’ खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा!
By admin | Published: May 12, 2015 01:58 AM2015-05-12T01:58:59+5:302015-05-12T01:58:59+5:30
डोंबिवली येथील भोंदूबाबा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तसेच त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत
ठाणे/कल्याण : डोंबिवली येथील भोंदूबाबा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तसेच त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या तथा आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली असून यासंदर्भात त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
शारीरिक संबंध ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडेल, अशी बतावणी करून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा विजय ठोंबरे आणि त्याची सहकारी जानकी यांना ठाणे बालकांचे हक्क व संरक्षण युनिटच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. मुंब्रा परिसरात राहणाऱ्या एका मुलीला तर त्याने दिल्लीतही नेल्याची बाब समोर आली असून राष्ट्रीय पातळीवर मुलांचा अनैतिक व्यापार करणाऱ्या टोळीशी या घटनेचा काही संबंध आहे का? याबाबतचाही सखोर तपास होणे आवश्यक असून पालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याने पिडीत मुलीच्या छोटया बहिणीला संरक्षण मिळणे अतिशय आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, रविवारी गोऱ्हे यांनी ठाणे येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
लैंगिक शोषणाचे प्रकार पूर्णपणे थांबवायचे असतील तर असे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या भोंदूबाबाच्या यवतमाळ येथील उस्तादला अटक करा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. या भोंदूबाबाचे दिल्लीपर्यंत नेटवर्क असून पीडित मुलीला दिल्लीपर्यंत नेण्यात आले होते. तिने तेथील भोंदूबाबाकडे जाण्यास विरोध केला, असे तपासातआढळून आले आहे. अशा भोंदूबाबांचे मोठे रॅकेट असून अल्पवयीन मुलींना लक्ष्य करणे, गरीब वस्तीत फिरून तेथे पैशांची लालूच दाखविणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. अघोरी विद्येचा वापर करून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या.