कृत्रिम तापमान तयार करुन 'त्याने' नागाच्या ३४ पिल्लांचा घडवला जन्म
By admin | Published: July 6, 2016 02:07 PM2016-07-06T14:07:43+5:302016-07-06T14:18:06+5:30
कृत्रिम तापमान तयार करुन नगर शहरातील सर्पमित्र आकाश जाधव यांनी तब्बल ३४ नागांच्या पिलांना जन्मदान देत निसर्गात मुक्त केले आहे.
अरुण वाघमोडे, ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ६ - कृत्रिम तापमान तयार करुन नगर शहरातील सर्पमित्र आकाश जाधव यांनी तब्बल ३४ नागांच्या पिलांचा जन्म घडवून आणला. याची जाधव यांनी वनविभागात नोंदही केली आहे़.
४२ दिवसांपूर्वी शहरातील बुरुडगाव येथे घरकामासाठी पाया खोदत असताना इंडियन कोब्रा जातीच्या नागाची ४२ अंडी आढळून आली़ यातील दहा ते बारा अंडी फुटली़ याबाबत परिसरातील नागरिकांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅण्ड सोशल वर्क सोसायटीचे सर्पमित्र आकाश जाधव यांना माहिती दिली.
जाधव यांच्यासह संस्थेचे अतुल पाखरे, नवाज शेख, समीर शेख यांनी घटनास्थळी जाऊन अंडी ताब्यात घेतली़ तसेच त्या अंड्यांसाठी एक लागडी पेटी तयार केली़ त्यामध्ये ३० ते ४० डिग्री तापमान लाईटद्वारे दिले़ जाधव दर दोन दिवसांनी त्या अंड्यांची तपासणी करत होते. ४२ दिवसानंतर यातील ३४ अंडी फुटून ३४ जिवंत नागांच्या पिल्लांनी जन्म घेतला़. सर्प जमिनीतील बिळात अंडी देतात त्यामुळे ती अंडी उबविण्याला नैसर्गिक तापमान मिळते़ ही अंडी जमिनीच्या बाहेर काढल्याने ती उबविण्यासाठी जाधव यांना कृत्रिम तामपान द्यावे लागले़.
जन्माताच विषारी
मे-जुलै महिन्यात नागाची मादी उंदराच्या बिळात किंवा मुंग्या नसतील अशा ठिकाणी वारुळात अंडी घालते़ एक मादी ३० ते ६० अंडी देऊ शकते़ या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी ६० ते ६२ दिवसांचा कालावधी लागतो़ तोपर्यंत अंड्यांचे रक्षण करण्यासाठी मादी तेथेच राहते़ नागाची पिल्ले जन्मताच विषारी असतात़ अंड्यातून बाहेर आल्यानंतर ही पिल्ले एक ते दोन आठवड्यानंतर दुसरीकडे निघून जातात़ किटक, सरडे, पाली, बेडूक, मंडमे व लहान बिनविषारी साप हे नागाचे भक्ष्य असल्याचे जाधव यांनी सांगितले़
१० वर्षात पकडले ४ हजार नाग
सर्पमित्र आकाश जाधव यांनी सातारा येथे वाईल्डलाईन प्रोटेक्शन अॅण्ड रिसर्च या संस्थेत सर्पाविषयी प्रशिक्षण घेतले आहे़ ते समाजात सार्पाविषयी प्रबोधन करतात़ गेल्या दहा वर्षात त्यांनी चार हजार सर्पांना पकडून निसर्गात मुक्त केले आहे़ तसेच सापांविषयी समाजत विविध गैरसमज असून, जाधव हे याबाबत लोकांचे प्रबोधन करतात़