बस पेटत असताना 'तो' गाढ झोपेत...साेंग घेतलं की दडून बसला, पोलीस चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:42+5:302021-02-11T09:24:47+5:30
Shivshahi Maharashtra Public Transport Bus Fire: दुकानदारांकडे चाैकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीसह आणखी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा : एकापाठोपाठ एक बस अशा पाच बसेस पेटत असताना तो मात्र सहाव्या बसमध्ये गाढ झोपेत होता. हे पाहून पोलीस अक्षरश: अवाक् झाले. त्याला बसमधून खाली उतरवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याने झोपेचे साेंग घेतली की, बसमध्ये दडून बसला, याची चाैकशी मात्र पोलीस त्या युवकाकडे रात्रभर करत होते.
बसस्थानकात उभ्या असलेल्या पाच शिवशाही बसेस पाठोपाठ जळून खाक झाल्या. घटनास्थळी पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी आल्यानंतर ते बसची पाहणी करत होते. त्यावेळी जळालेल्या पाच बसच्या शेजारी जळीतकांडात वाचलेली सहावी बस उभी होती. बसचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी शिवशाही बसच्या पाठीमागील सीटरवर एक युवक झोपला असल्याचे त्यांना दिसले. पोलिसाने त्याला उठवून त्याची काॅलर पकडून ओढतच बसमधून बाहेर काढले. पाच बस पेटत असताना तो इतका शांत कसा राहिला, का त्याने झोपेचे सोंग घेतले होते, अशी शंका त्याचवेळी अनेकांना आली. बसमधून त्याला खाली उतरवल्यानंतर ओढतच पोलीस गाडीमध्ये नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी फोटो काढत असल्याचे पाहून चेहऱ्यावर हात ठेवला. जमावाकडून त्याला मारहाण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याला कडे करून पोलीस गाडीत बसविले. त्यानंतर गाडी त्याला घेऊन पोलीस ठाण्यात रवाना झाली.
वास्तविक पाहिलं, तर या आगीबाबत घटनास्थळी वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत होती. कोणी म्हणत होते, दोन युवक बसमध्ये सिगारेट ओढत होते. पेटती सिगारेट बसमध्ये टाकल्याने आतील पडद्यांनी पेट घेतला; तर काहीजण म्हणत होते, झोपेच साेंग घेतलेल्या युवकाने आग लावून नंतर तो बसमधून जाऊन झोपला. या चर्चेमुळे पोलीसही काहीवेळ संभ्रमात पडले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे शोधण्यावर भर दिला. दुकानदारांकडे चाैकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीसह आणखी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अनेकांचे हात चित्रीकरण करण्यात रमले
एकापाठोपाठ एक अशा पाच बसेस पेट घेत असताना अनेक बघ्यांचे हात आगीचे दृश्य चित्रीत करण्यात रमले होते. काही मोजक्याच लोकांनी पुढे येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. शंभर ते दीडशेजणांचा जमाव केवळ हातात मोबाईल घेऊन फोटो आणि चित्रीकरण करू लागला. या हातांनी एक एक करत पाणी आणले असते, तर हे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते, असे घटनास्थळी बोलले जात होते.
म्हणे, मूकबधिर मुलाने पेटती सिगारेट टाकली
गाडीतून धूर येत असल्याने मॅनेजर तुपे हे गाडीजवळ गेेले. त्यावेळी गाडीतून एक मुलगा उतरला. त्यानंतर तो पळू लागला. नागरिकांनी त्याला पकडल्यानंतर त्यानेच गाडीत पेटती सिगारेट टाकली असल्याचे नागरिक सांगत होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला नीट बोलताही येत नाही. त्याच्या आईला बोलाविल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. प्राथमिकदृष्या काहीही माहिती न मिळाल्याने त्याला सोडून दिले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.