त्याने सगळ्या विषयांत मिळवले प्रत्येकी 35 गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 05:46 PM2017-06-13T17:46:10+5:302017-06-13T20:12:25+5:30

एखादा ढ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून पास झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आज जाहीर झालेल्या

He got 35 marks in each subject | त्याने सगळ्या विषयांत मिळवले प्रत्येकी 35 गुण

त्याने सगळ्या विषयांत मिळवले प्रत्येकी 35 गुण

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
परंडा (उस्मानाबाद), दि. 13 - एखादा ढ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून पास झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालांमध्येही एका विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून पास होण्याची किमया साधली आहे. शिक्षण मंडळाच्या लातूर विभागातील परंडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिकणाऱ्या नाहेद अहमद कुरेशी याने प्रत्येक विषयात 35 गुण मिळवण्याचा हा अजब योगायोग साधला आहे. 
एकीकडे पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे नाहीदने मिळवलेले अजब यशही कौतुकाचा विषय ठरले आहे. नाहेद याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्रे अशा सर्वच विषयात प्रत्येकी 35 गुण मिळाले आहेत. बेस्ट ऑफ 5 नुसार त्याचे एकूण गुण 175 एवढे झाले असून, त्याची टक्केवारीही बरोब्बर 35 टक्के एवढीच आहे. दरम्यान, नाहेदने मिळवलेल्या जरा हटके यशानंतर राजकीय पक्षांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
  परंड्यांच्या कुरेशी गल्लीतील छोट्याश्या घरात राहणारे अहमद कुरेशी हे नाहेदचे वडील़ पत्नी व दोन मुलांसह ते येथे वास्तव्यास आहेत़ कुरेशी समाजाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैश्यांवर त्यांच्या कुटूंबाची गुजराण होते़ शाळेशी मात्र त्यांची पिढीजात कट्टी़ त्यांच्या खानदानातील अनेकांनी शाळेची पायरीही चढली नाही़ स्वत: अहमद कुरेशीही अशिक्षित आहेत़ परंतु, मुलांना शिक्षण मिळावे, या हेतूने त्यांनी नाहेद व अरकान या मुलांना परंडा येथील जिल्हा परिषद शाळेत घातले़ दोघेही नियमित शाळेत जातात़ यातील नाहेदने वडीलांच्या व्यवसायाला मदत करीत-करीत जमेल तसा अभ्यास करुन यंदा दहावीची परीक्षा दिली होती़ मात्र, तो पास होईल की नाही, याबाबत नाहेदसोबतच त्याच्या कुटूंबातील कोणासही फारशी शाश्वती नव्हती़ त्यामुळे निकालाबाबत त्यांच्या घरी सोमवारी दुपारपर्यंत कसलीही उत्सुकता नव्हती़ परंतु, दुपारी नाहेदने आपला निकाल पाहिला अन् क्षणभर तो स्तब्धच झाला़ सर्वच विषयात काठावरचे ३५ गुण मिळवीत त्याने १०वीची नैय्या पार केली होती़ हा निकाल कळताच घरातलाही ‘नूर’ अचानक पालटला़ नाहेदचे कोडकौतुक सुरु झाले़ परंड्याचे नाव या आगळ्या-वेगळ्या निकालाने राज्यभर नेणाऱ्या नाहेदचा मग गावातील नागरिकांनी दणक्यात सत्कार करुन कौतुकाचा वर्षाव केला़


खानदानातील पहिला ‘चिराग’
नाहेद कुरेशी या विद्यार्थ्याच्या कुटूंबात कोणीही शिकलेले नाही़ इतकेच काय तर त्यांच्या खानदानातही कोणी १० उत्तीर्ण झाले नाही़ नाहेद ही १०वी पार करणारा खानदानातील पहिलाच चिराग असल्याचे त्याचे वडील अहमद कुरेशी यांनी सांगितले़

आता उमेदीने शिकणार : नाहेद
उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असला कोणताही विचार डोक्यात न ठेवता जमेल व झेपेल तेवढा अभ्यास केला होता़ आता उत्तीर्ण झाल्यामुळे मनोबल वाढले असून, पुढे जास्त उमेदीने परीश्रम घेणार असल्याचे नाहेद कुरेशी म्हणाला़

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल  ८८.७४ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. राज्याच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नापास झालेल्या विद्यार्थींची फेरपरीक्षा 18 जुलैला घेण्यात येणार आहे.  
१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत.  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत.  90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले. 

Web Title: He got 35 marks in each subject

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.