सायकलच्या चाकांवरून तो पाहतोय जग

By admin | Published: November 4, 2016 01:53 AM2016-11-04T01:53:07+5:302016-11-04T01:53:07+5:30

इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर वकिली व्यवसायात स्थिरावण्याऐवजी, त्याने चक्क सायकलला पायडल मारले आणि निघाला जगाच्या भ्रमंतीला

He is looking at the wheel with the wheels of the world | सायकलच्या चाकांवरून तो पाहतोय जग

सायकलच्या चाकांवरून तो पाहतोय जग

Next

आमोद काटदरे,

ठाणे- इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर वकिली व्यवसायात स्थिरावण्याऐवजी, त्याने चक्क सायकलला पायडल मारले आणि निघाला जगाच्या भ्रमंतीला. तब्बल २३ देश पालथे घातल्यानंतर, जोशाह स्केट््स सध्या भारतात फिरतो आहे. कन्याकुमारीहून सायकलवर स्वार झालेला जोशाह, गेले पाच दिवस ठाणे जिल्ह्यात ठाकुर्लीला मुक्कामाला होता. आतापर्यंत १६ हजार किलोमीटर अंतर सायकलवरून कापलेल्या जोशाहने, दिवाळीच्या फराळापासून आयुष्यात प्रथमच फटाके वाजवण्यापर्यंतची मौज लुटली आणि शुक्रवारी सकाळपासून तो पुढच्या मुक्कामासाठी रवाना होतो आहे.
लंडनपासून तासाभरावर असलेल्या कँटरबरीचा रहिवासी असलेला जोशाह अवघ्या २३ वर्षांचा. या ध्येयवेड्याने प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असतानाच, सायकलद्वारे जगभ्रमंती केलेल्या व्यक्तीवरचा लेख आॅनलाइनवर वाचला आणि तेव्हाच अशा अचाट मोहिमेचे बीज त्याच्या डोक्यात पेरले गेले. याच काळात त्याने फ्रान्स आणि अमेरिकेत प्रत्येकी सहा महिने नोकरी केली. त्यातून जमा झालेल्या पुंजीतून तो गेल्या वर्षी २४ मे पासून सायकलवरून युनायटेड किंगडम ते आॅस्ट्रेलियाच्या भ्रमंतीला निघाला. ही मोहीम अवघड आणि अतिशय खडतर असल्याने, असे साहस न करण्याचा सल्ला मित्रांनी दिला, पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे त्याने हे शिवधनुष्य पेलले. पहिल्या दिवशी पाच मित्रांनीही त्याच्या मोहिमेत सहभागी होत, त्याला साथ दिली.
एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात जगभरातील उत्कृष्ट शहरे, विविध ठिकाणे पाहायची. जगभरातील माणसांना भेटायचे, नवे अनुभव घ्यायचे, त्याच्या आठवणी जपण्यासाठी या मोहिमेवर निघाल्याचे जोशाहने सांगितले. इंग्लंडमधून निघाल्यानंतर, त्याने १० दिवस फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये तीन दिवस, जर्मनीत २० दिवस आणि आॅस्ट्रियात २० दिवस भ्रमंती केली.
>पोहे, करंजी आवडली
अनेकदा लोकांच्या-सायकलप्रेमींच्या घरी राहात असल्याने, भारतातील प्रवास खर्च दरदिवशी १०० रुपये असल्याचे तो सांगतो. कोचीत एका सायकलिंग क्लबने त्याला मदत दिली. सध्या ठाकुर्लीत तो सायकलप्रेमी कुणाल भावे यांच्या घरी पाच दिवस मुक्कामाला होता. ऐन दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद त्याने घेतला.
>पुन्हा भारतात येणार
ठाकुर्लीतून तो शुक्रवारी सकाळी अहमदाबादला रवाना होणार आहे. जयपूर, आग्रा, दिल्लीमार्गे तो नेपाळला जाईल. दीड महिन्यात त्याला हा टप्पा गाठायचा आहे. भारताचा व्हिसा तीन महिन्यांचाच मिळाल्याने, पुन्हा नेपाळमधून तो भारतीय व्हिसासाठी अर्ज करणार आहे. नेपाळमार्गे भारतात प्रवेश करून ईशान्येकडील देशांमधून म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, आणि पुढे न्यूझिलंडला जाईल.
>दैनंदिन प्रवास : जोशाहचा प्रवास दररोज सकाळी ६ वाजता सुरू होतो. रोज किमान ८०-१०० कि.मी.चे अंतर कापण्याचे त्याचे ध्येय असते. दर दोन तासांनी तो विश्रांती घेतो. प्रवासात तो फक्त फळे आणि हलका आहार घेतो. काही ठिकाणी भाषेची अडचण जाणवते, पण खाणाखुणा करून वेळ मारून न्यावी लागते, असे अनुभवही त्याने सांगितले.

Web Title: He is looking at the wheel with the wheels of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.