अवघ्या दोनशे रुपयांसाठी त्याने गमावले कुटुंब
By admin | Published: November 6, 2016 02:19 AM2016-11-06T02:19:30+5:302016-11-06T02:19:30+5:30
मुंबादेवीला जाण्यासाठी आणखी एक टॅक्सी केल्यास अधिकचे दोनशे रुपये खर्च करावे लागतील त्यापेक्षा एकत्रच अॅडजेस्टमेंट करून एकाच टॅक्सीतून जाऊ या, असा अवघ्या दोनशे
- मनीषा म्हात्रे, मुंबई
मुंबादेवीला जाण्यासाठी आणखी एक टॅक्सी केल्यास अधिकचे दोनशे रुपये खर्च करावे लागतील त्यापेक्षा एकत्रच अॅडजेस्टमेंट करून एकाच टॅक्सीतून जाऊ या, असा अवघ्या दोनशे रुपयांसाठी घेतलेला निर्णय वर्मा कुटुंबीयांच्या जिवावर बेतल्याची हृदयद्रावक कहाणी समोर आली. यात गेल्या २० वर्षांपासून असलेल्या गाडी चालविण्याचा अतिआत्मविश्वासही चालकाला नडल्याचे दिसून आले.
वडाळा येथील भीमवाडी परिसरात मंगरू वर्मा (४०), पत्नी अंतरा आणि मुलगा राजकुमार, मुलगी आशासोबत भाड्याने राहतो. गेल्या २० वर्षांपासून तो टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दिवाळीची सुटी असल्याने अंतराने बहीण राजश्रीच्या कुटुंबीयांना घरी बोलावून घेतले होते. शुक्रवारी रात्री राजश्री ही पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी आली. रात्री त्यांनी एकत्र जेवण केले. जेवतानाच त्यांनी शनिवारी सकाळी मुंबादेवीच्या दर्शनाचा बेत आखला.
या वेळी दोन टॅक्सी करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी निघताना मंगरूने सहकारी टॅक्सीचालक मित्राला फोन केला होता, अशी माहिती त्याचे नातेवाईक मुन्ना वर्मा यांनी दिली. तेव्हा कमीतकमी २०० रुपये होतील असे त्याला सांगण्यात आले.
मात्र अधिकचे दोनशे रुपये कशाला खर्च करायचे? ८ जणांना टॅक्सीतून नेताना अडचण येणार नाही. या विचाराने त्याने रवीसह आणखी एकाला पुढच्या सीटवर बसविले; तर पाठीमागे पत्नी, मुलगी तसेच साडूच्या कुटुंबीयांना बसविले. आशा आणि राजकुमार त्यांच्या पायात बसले होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्याने घर सोडले. तेथून वाडीबंदर येथे वळण घेत असताना अचानक वाढलेल्या भारामुळे टॅक्सीचा दरवाजा उघडला. त्यातून दोघी जणी खाली फेकल्या गेल्या. ते पाहताच मंगरूचेही गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.
काय झाले कळलेच नाही...
आम्ही गप्पा मारत मुंबादेवीच्या दर्शनाला निघालो. अशात अचानक गाडीचा दरवाजा उघडला. मी पायाजवळ असल्याने काही समजले नाही. काय झाले कळण्याच्या आतच आमची गाडी खांबावरून भिंतीला धडकली. त्यानंतर कुटुंबीय बेशुद्धावस्थेत दिसले. काय करायचे सुचत नव्हते. सारेकाही शांत झाले होते आणि मीही खाली कोसळलो, असे यामध्ये जखमी झालेल्या विनय वर्माने सांगितले.
घटनास्थळावरील वास्तव
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी त्यांच्या चौकीच्या खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा अपघाताचे भीषण वास्तव लक्षात घेत त्यांनी अवघ्या काही मिनिटांत तेथे धाव घेतली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात गाडीत अडकलेल्या कुटुंबीयांपैकी प्रथम कुणाला काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. या वेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तांबे, पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे आणि सुरवडे घटनास्थळी दाखल होते. त्यापाठोपाठ डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश कातकर यांनी सहकारी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. दोन महिलांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते तर सात जण टॅक्सीमध्ये अडकले होते.
अजूनही कुटुंबीय जगल्याची आशा... आम्ही एकत्र जाऊ असा विचार मनात होता. म्हणून दुसरी टॅक्सी करणे गरजेचे समजले नाही. मात्र माझ्या बाजूने गेलेल्या बसला सावरण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे मंगरू याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अपघातानंतर मी व साडूचे दोन मुले आम्ही शुद्धीवर होतो. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुटुंबीयांना पाहून माझी शुद्ध हरपली. त्यानंतर जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होतो. माझ्या मुलांवर, पत्नीवर उपचार सुरू आहेत, असे मंगरूने ‘लोकमत’ला सांगितले. अपघातात त्याच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याबद्दल तो अनभिज्ञ आहे.
‘माझे आई-वडील
कसे आहेत?
अपघातात आई-वडिलांसह बहिणीच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ असलेले रवी वर्मा डॉक्टर, नातेवाइकांकडे आई- वडिलांबाबत चौकशी करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून नातेवाइकांकडून कुटुंबीयांवर उपचार सुरू असल्याबाबत सांगण्यात येत आहे.
घरी जेवणासाठी येणार होते... कालच सुरतहून नात्याने दीर लागत असलेला हरिकेश घरी आल्याने आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. रात्रीचे जेवण त्यांनी अंतराच्या घरी केले, मात्र शनिवारी रात्री ते आमच्याकडे जेवणाला येणार होते. त्यानुसार मी बेतही ठरवला होता. मात्र सकाळी सुरतच्या भावाकडून मिळालेल्या माहितीने धक्काच बसला. त्याच्याकडून आम्हाला या अपघाताची माहिती मिळाल्याचे सरस्वती रामचंद्र वर्मा यांनी सांगितले. या घटनेमुळे वर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.