नातवाचा हव्यास आणि भरभराटीच्या मोहापायी त्यांनी गमावले २६ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 08:55 PM2018-02-05T20:55:33+5:302018-02-05T20:56:06+5:30
बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला बळी पडून....
पुणे - बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला खासगी कंपनीतील ज्येष्ठ कर्मचारी बळी पडला. पण, भरभराट राहिली दूरच तो स्वत:चे आणि निवृत्तीनंतर मिळालेले तब्बल २६ लाख रुपये गमवण्याची वेळ त्यांच्यावर आली़ मांजरी येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून हडपसर पोलिसांनी या भोंदुबाबाला अटक केली आहे़ त्याची साथीदार महिला मात्र फरारी झाली आहे़
सुनिल रामशरण सरोज (वय ५०, रा़ थिटे शाळेजवळ, खराडी) असे या भोदुबाबाचे नाव असून हडपसर पोलिसांनी जादुटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी समीर विलास कामठे (वय ३३, रा़ महादेवनगर, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांचे वडिल कामठे हे एका खासगी कंपनीत कामाला होते़ तेथेच सुनिलही कॉट्रक्ट पद्धतीने कामाला आहे़ त्यातून त्यांचा परिचय झाला़ आपल्या मुलाला पहिल्या दोन्ही मुलीच आहेत़ मुलगा हवा असे त्यांनी सुनिलला सांगितले़ त्याने आपल्या ओळखीची एक महिला आहे़ तिने सांगितलेले उपाय केले तर हमखास मुलगा होईल, असे सांगून त्याने विलास कामठे यांना खराडी येथील महिलेकडे आॅक्टोबर २०१६ला घेऊन गेला़ सुनिल व या महिलेने त्यांना वश करुन आपण सांगू तसे करण्यास लावले़ नाही केले तर जादू टोण्याची भिती दाखविली़ तुम्ही आम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या तर मुलगा होईल व तुमच्या घरात आर्थिक भरभराट होईल, असे सांगितले़ व नाही केले तर तुमच्या घरावर अनिष्ट संकट येईल़ तुमच्या घरातील लोकांचे मृत्यु होईल अशी जादू टोण्याची भिती दाखविली़ त्यामुळे विलास कामठे हे ते सांगतील तसे करत गेले़ गेल्या वर्षी त्यांनी एक वर्षे अगोदरच सेवा निवृत्ती घेतली़ सुनिल व या महिलेने आॅक्टोंबर २०१६ पासून वेळोवेळी त्यांच्याकडून ९ लाख रुपये रोख व १७ लाख २० हजार रुपये खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले़
पोलिसांनी सुनिल सरोज याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले़ सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करायची आहे़ मुलगा होईल म्हणून खराडी येथे आरोपीने वेगवेगही अघोरी उपाय केले आहेत़ त्याबाबत तपास करुन महिला साथीदाराला अटक करायची आहे़ न्यायालयाने त्याला ९ फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे अधिक तपास करीत आहेत़
पासबुकामुळे प्रकार उघडकीस
विलास कामठे यांना डिसेंबर २०१७ मध्ये मानसिक धक्का बसला़ त्यामुळे ते घरात विचित्र वागू लागले़ त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले़ त्यांच्यावर मानसोउपचार तज्ञांकडून उपचार सुरु असताना कुटुंबातील सदस्यांनी कपाटातील त्याचे बँक पास पाहिले़ त्यातील उलाढाल पाहून त्यांना धक्का बसला़ मार्च २०१७ मध्ये विलास कामठे यांनी सेवानिवृत्ती घेतली़ सेवानिवृत्तीचे मिळालेले पैसे व त्याअगोदर त्यांच्या बँक खात्यात मोठ्या रक्कमा ट्रान्सफर केल्याचे दिसून आले़ त्याची अधिक माहिती घेतल्यावर त्या सुनिल याच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले़ त्यातून हा प्रकार उघडकीस आला़ त्यानंतर त्यांचा मुलगा समीर कामठे यांनी पोलिसांत धाव घेतली़