बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी..; दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:08 PM2022-08-29T14:08:10+5:302022-08-29T14:08:31+5:30
बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत असं केसरकरांनी म्हटलं.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सर्व सहकारी बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन चाललो आहोत. दसरा मेळावा आणि बाळासाहेब हे वेगळं करता येत नाही. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाच्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतली नाही. दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलेली परंपरा आहे. वाद निर्माण करण्याचा कुठलाही उद्देश नाही. जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी दूर गेलेत त्यांनी काय करावं? कुणाची युती करावी न करावी हा विचार त्यांनी करावा असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत. बाळासाहेब हिंदुत्वापासून कधीही लांब गेले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. हेच राज्यात घडलं. त्यालाच बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणे म्हणतात. आम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी दूर गेलो नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये याबाबत कुठलीही चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नाही. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा, मग त्याचठिकाणी मेळावा घ्यावा असं नाही. दुसरीकडेही घेऊ शकतात. परंतु अद्याप या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही. जेव्हा हा विषय असेल तेव्हा मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी हायकोर्टाचे अनेक निर्बंध आहेत. त्याठिकाणी कुणाला परवानगी द्यावी याबाबत चर्चा होईल. यावर कुठलाही पक्षपाती निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार नाहीत. कुणाबाबत दुजाभाव होणार नाही. मुंबईत विविध मैदाने आहेत. विचारधारा महत्त्वाची आहे, मैदान नाही. दसरा मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी येणार नाहीत कारण त्यांची विचारधारा हिंदुत्ववादी विरोधात आहे असंही केसरकरांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ
शिवसेना ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत शिवसेनेचं रोपटं बाळासाहेबांनी लावले. त्याचे वृक्षात रुपांतर झाले आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत. महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या स्वप्नातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे लाभले आहेत. बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ आहेत असंही दीपक केसरकरांनी सांगितले.
भरत गोगावले चुकले, दीपक केसरकरांचा खुलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली समज
खोके संस्कृती काँग्रेस-राष्ट्रवादीची
खोके संस्कृती महाराष्ट्रात कुणी आणली हे जनतेला माहिती आहे. ही संस्कृती काँग्रेस-राष्ट्रवादीने आणली. आम्हाला त्याबाबत देणंघेणं नाही. ५० खोके म्हणजे ५० कोटी. जर आम्ही ५० हजार घेतल्याचं सिद्ध झाले तर राजीनामा देईन. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल. चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्यांना फेस करावं लागलं. ग्लोबल्स निती विरोधकांकडून खेळली जाते. वारंवार खोटं सांगून ते सत्य मानलं जाते. १०० वेळा खोटे बोलले तर ते लोकांना खरे वाटते. ही निती महाराष्ट्रात चालणार नाही असंही दीपक केसरकरांनी सांगितले.