पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीची काळजी मोदींनी करू नये, धनंजय मुंडेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 06:27 PM2019-04-01T18:27:27+5:302019-04-01T18:27:29+5:30
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य करणाऱ्या मोदींवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना शरद पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य करणाऱ्या मोदींवर जोरदार टीका केली आहे. ''शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये,''असा टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेतून शरद पवार यांच्या कुटुंबात असलेल्या कलहाचा उल्लेख केला होता. त्याला धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.''आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे.''असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 1, 2019
तसेच वर्धा येथील सभेला असलेल्या लोकांच्या कमी उपस्थितीवरूनही धनंजय मुंडे यांनी मोदी आणि भाजपाला कोपरखळी मारली. ''वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की झाले आहे. २०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणले पाहिजे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की. २०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 1, 2019