आईच्या काळजात त्यांनी कट्यार घुसवली; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबाेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:29 AM2022-10-10T06:29:34+5:302022-10-10T06:30:00+5:30
न्यायालयात पहिले प्रकरण १६ आमदारांच्या अपात्रतेचे होते. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा उलट्या काळजाच्या माणसांनी ‘शिवसेना’ हे पवित्र नाव, धनुष्यबाण हे पवित्र चिन्ह गोठवले. त्यांना आनंदाने उकळ्या फुटत असतील, पण त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, त्यांना जास्त आनंद होत असेल. ४० डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीराम चंद्राचे धनुष्यबाण गोठवले, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गट व भाजपवर हल्लाबोल केला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रविवारी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले, चिन्हं आणि नाव गोठवणे हा अन्याय आहे. न्यायालयात पहिले प्रकरण १६ आमदारांच्या अपात्रतेचे होते. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता. उद्या ते आमदार अपात्र ठरले, तर गोठवलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची कुणी, असा सवाल त्यांनी केला.