थोडीशी रिस्क घेतली अन् पठ्ठ्यानं एका एकरात 10 लाखांचं उत्पन्न कमावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:27 PM2020-07-09T16:27:33+5:302020-07-09T17:28:20+5:30
दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजच्या धनराज भुसारेनं पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची शेती केली.
बीड - कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, वाचतो आणि पाहतोही. मात्र, शेतीचं योग्य नियोजन केल्यास, शेतात पिक लावण्यापासून ते त्याच्या उत्पन्नापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक माहितीच्या आधारे शेती केल्यास, ही काळी आई नक्कीच आपल्या बळीराजाला जगवते. शेतकऱ्याचा संसार सुखाने फुलवते. बीडमधील एका शेतकरीपुत्राने अशीच डोक्यॅलिटीने शेती करत भरगोस उत्पन्न मिळवले आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजच्या धनराज भुसारेनं पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची शेती केली. कित्येकांच्या विरोधाला झुगारुन नवीन प्रयोग करण्याच्या हेतुने धनराजने विश्वास पेरून आत्मविश्वास उगविण्याचं काम केलंय. या प्रयोगशील शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन या नेहमीच्या पिकांऐवजी शतावरीचं पीक घेतलं. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केवळ 18 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्नही धनराजनं मिळवलं. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हे दुष्टचक्र या भागाने पाहिलंय. येथील मातीनंही अनेकदा पावसाअभावी दुष्काळ झेललाय. मात्र, याच मातीत शतावरीची पेरणी करुन धनराजनं सोनं उगविण्याची किमया करुन दाखवलीय.
केज तालुक्यातील धनराज भुसारे यांनी एक एकर शेतात शतावरीचं पीक घेतलं. शतावरी ही औषधी वनस्पती असून मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यातून चांगलं उत्पन्न मिळतं, असे धनराज भुसारे यांना समजले. त्यांनी एका खासगी कंपनीशी करार करुन शतावरीची लागवड केली. 18 महिन्यानंतर आता त्यांचं पीक काढणीला आलं आहे. शतावरी पिकातून त्यांना अठरा महिन्यात तब्बल दहा लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं आहे.
पुण्यातील एका खासगी कंपनीने भुसारे यांना शतावरीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केलं. भुसारे पारंपरिक शेती करत होते. मात्र, अशातच त्यांनी शतावरी लागवडीची माहिती घेऊन, नियोजन केलं. अठरा महिन्यानंतर पीक पूर्ण झालं असून अॅग्रो कंपनीने शतावरीचा हा एक एकराचा फड खरेदी केला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हे पीक मुळापासून काढण्यात येतं.
माहितीचा अभाव, नवतंत्रज्ञानाची निवड न करणे आणि रिस्क घेण्याची तयारी नसल्यानेच शेतकरी बांधवांना पारंपरिक पिकांना घेऊन शेती करावी. अर्थातच, मान्सून आणि पाणी हे दोन्ही घटक शेतीसाठी महत्त्वाचे ठरतातच. मात्र, तरीही काळानुसार माणसाने शेतीत, शेतीपिकात आणि शेतीच्या मशागतीतही बदल करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, नवनवीन प्रयोग करत मातीशी जोडलेलं नातं बळीराजाच्या कुटुंबात समृद्धी आणेल हे मात्र ज्ञानेश्वर भुसारे यांनी घेतलेल्या जोखिमीवरुन दिसून येतंय.