त्याची आधी ऑनलाईन फसवणूक झाली, आता तो लोकांना फसवतो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 05:50 PM2017-10-17T17:50:47+5:302017-10-17T17:54:46+5:30
शासनमान्य इ-महासेवा केंद्र मिळवा असा एसएमएस करत लाखो रुपयाचा ऑनलाईन गंडा घालणा-या एका सायबर गुन्हेगारास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद : शासनमान्य इ-महासेवा केंद्र मिळवा असा एसएमएस करत लाखो रुपयाचा ऑनलाईन गंडा घालणा-या एका सायबर गुन्हेगारास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. तब्बल एक वर्षापासून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने विविध राज्यात ८० जणांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी माहिती दिली की, शेखर ओमप्रसाद पोदार (32) असे आरोपीचे नाव आहे. तो आठवी पास असून नागपुरमध्ये जरीपटका येथे राहतो. एक वर्षापूर्वी ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून त्याची फसवणूक झाली होती. यातून आपणही अशी फसवणूक करू शकतो अशी कल्पना त्याला सुचली. यानंतर मित्राच्या मदतीने त्याने एक वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटच्या माध्यमातून त्याने लोकांना इ-महासेवा केंद्र मिळवा अशा आशयाचे एसएमएस केले. यासाठी तो प्रत्येकी १५१०० हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून जमा करायचा.
याचा फटका औरंगाबादच्या वदोडबाजार येथील रमेश कुलकर्णी यांना बसला. त्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाचे चक्र फिरवत शेखर याला नागपूर येथून ताब्यात घेतले. शेखर व त्याच्या साथीदारांनी या वेबसाईटद्वारे देशातील जवळपास ८० जणांची फसवणूक केली असून यातून ५० लाख रुपये हडपले आहेत. त्याच्या विरुद्ध उत्तरप्रदेश, नागपूर व औरंगाबादेत गुन्हे नोंद आहेत. न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.