"दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले", किरीट सोमय्यांना नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:05 PM2023-07-18T16:05:10+5:302023-07-18T16:06:42+5:30

Nana Patole Criticize Kirit Somayya: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे

"He who stripped another's clothes has been stripped of his clothes today", Nana Patole Criticize Kirit Somayya | "दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले", किरीट सोमय्यांना नाना पटोलेंचा टोला

"दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले", किरीट सोमय्यांना नाना पटोलेंचा टोला

googlenewsNext

मुंबई -  भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे, असे विधान काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

किरीट सोमय्या यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, २०१४ पासून राज्यात सीबीआय, ईडी. आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भिती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरु आहे. भाजपाने, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? असा परिस्थिती झाली आहे. जी व्यक्ती दुसऱ्यांचे वस्त्रहरण करत होती त्याच व्यक्तीचे आता वस्त्रहरण झालेले आहे. पण हा मुद्दा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा नाही तर काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महागाई, शेतकरी, महिला, कायदा सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत. महागाई गगनाला भिडली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, सरकार विधानसभेत घोषणा करते पण मदत मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहे, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. 

बेरोजगारीचा प्रश्न मोठा गंभीर आहे, सरकारी नोकर भरती करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. राज्यात ५० ते ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत परंतु ती भरली जात नाहीत आणि निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा अफलातून शासन आदेश जारी केलेला आहे. हा शासन आदेश शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा घोर अपमान करणारा आहे. या शासन आदेशाविरोधात पुण्यात बेरोजगार तरुण आंदोलनही करत आहेत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे असेही पटोले यांनी सांगितले. 

Web Title: "He who stripped another's clothes has been stripped of his clothes today", Nana Patole Criticize Kirit Somayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.