मोपलवार भ्रष्टाचारात दोषी आढळल्यास पदावरून हटवणार, मुंडेंच्या आक्रमकतेनंतर सीएमची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 05:41 PM2017-08-02T17:41:01+5:302017-08-02T17:41:15+5:30
मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांच्या संभाषणाचा 'समृद्धी'शी संबंध असल्यास त्यांना पदावरून हटवण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
मुंबई, दि. 2 - मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी 'समृद्धी' महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार हे कोट्यवधी रुपयांच्या लाच देवाणघेवाणीबाबत बोलत असल्याचे ऑडियो संभाषण विधान परिषदेत सादर करत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोपलवार यांना पदावरून हटवण्याची जोरदार मागणी केली. मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांच्या संभाषणाचा 'समृद्धी'शी संबंध असल्यास त्यांना पदावरून हटवण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार हे जमिनींचे बेकायदा वाटप व कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारण्याबाबत दूरध्वनीवरून मध्यस्थाशी चर्चा करीत असल्याची ऑडिओ क्लिप कालपासून माध्यमांमध्ये फिरत आहे. त्या क्लिपची दखल घेऊन मुंडे यांनी नियम 289 अन्वये तो मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपची सीडी तसेच मुद्रित संभाषणही सभागृहात सादर केले. मुंडे यांनी यासंदर्भात सांगितले की, समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून, इतका गंभीर, संवेदनशील विषय मोपलवार यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडे का सोपवण्यात आला आहे ?, समृद्धीचे प्रमुख अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांचे मोपलवार यांच्याशी नियमित संभाषण होत असल्याने ध्वनिफितीतील मोपलवारांचा आवाज ओळखणे मुख्यमंत्र्यांना सहजशक्य आहे. मोपलवारांनी मंत्रालयातही कोट्यवधी रुपये द्यावे लागतील, असा उल्लेख केला आहे. हे पैसे कुणाला द्यावे लागतात, असा प्रश्नही मुंडे यांनी विचारला.
मोपलवारांच्या संभाषणातील 'त्या' व्यक्ती कोण आहेत ?, मुख्यमंत्री गेली अडीच वर्षे केवळ भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करण्याचेच आश्वासन देतात, परंतु भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही, हा अनुभव आहे. समृद्धीसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पावर मोपलवार यांच्यासारखा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असणारा अधिकारी असणे योग्य नाही, त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदावरून हटवण्यात यावे. धनंजय मुंडे व अन्य सदस्यांच्या संतप्त, आग्रही भूमिकेनंतर, मोपलवारांच्या संभाषणाचा समृद्धीशी संबंध असल्यास त्यांना पदावरून दूर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली.
विधानसभेत आज विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. राधेश्याम मोपलवार प्रकरणावरून विरोधकांसह अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. मोपलवारांच्या निलंबनाशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोपलवारांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. मोपलवार प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मोपलवार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मोपलवारांवरचे सगळे आरोप आघाडीच्या काळातील आहेत, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनींच्या अधिग्रहणाची महत्त्वाची जबाबदारी मोपलवारांवर सोपवण्यात आली आहे. 90 टक्के शेतकऱ्यांनी मोबदला घेऊन जमीन देण्यास परवानगी दिली असून, या प्रकल्पातील बहुतांश अडथळे दूर झाल्याने ऑक्टोबरमध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा राधेश्याम मोपलवार यांनी केला होता.