'त्यानं' २१ महिने ९ दिवसांत लिहिले कुरान
By admin | Published: June 23, 2016 07:43 PM2016-06-23T19:43:21+5:302016-06-23T19:43:21+5:30
इच्छाशक्ती प्रबळ असेल की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, ही उक्ती खरी करुन दाखवली आहे.
इरफान शेख
कुर्डूवाडी, दि. 23 - इच्छाशक्ती प्रबळ असेल की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, ही उक्ती खरी करुन दाखवली आहे. बार्शीतील एका ७५ वर्षीय वृद्धाने़ सतत २१ महिने ९ दिवसांत मुस्लीम समाजाचा पवित्र धर्मग्रंथ कुरआन शरीफची जशीच्या तशी प्रत हाताने लिहून काढली़. यात अरबी व्याकरणासोबतच जेर, जबर, नुक्ता यासारख्या व्याकरणात्मक दुरुस्तीसह. त्यांचे नाव आहे बार्शी येथील हाजी गुलाब बाबुलाल पठाण-नगीनावाले़ वर्तमानकाळात वाचन करणेही जीवावर येत असताना हाजी गुलाब बाबुलाल पठाण-नगीनावाले यांनी हुबेहुब कुरआन शरीफची प्रत हाताने लिहिली़.
अगदी हालाखीची परिस्थिती़ दोन महिन्याचे असताना वडिलांचे निधन झाले. आई रतनबी यांनी कै. अॅड. वासुदेव दत्तात्रय सुलाखे यांच्या घरी घरकाम करुन आमचा सांभाळ केला. बेताची परिस्थिती असल्यामुळे पाव विकणे, हॉटेलात काम करणे अशी कामे करुन आईला हातभार लावला़ शाळेत जाण्याऐवजी ऐन बालपणातच शाहीर अमर शेख चौकात सायकल दुरुस्तीची टपरी उभी केली़.
१९८६ साली मदिना मशीद बार्शी येथे इमामत करण्यासाठी हाजी अय्याजुल कादरी रजवी हे आले होते़ त्यांना सायकल चालविण्याची सवय होती़ यातूनच माझी त्यांच्याशी मैत्री झाली़ हाजी रजवी यांनी मला नमाज पठण व कुरआन तिलावत करण्याची विनंती केली. तसेच आयत, दुवा, सुरे पाठांतरासाठी हिंदीत, आरबी भाषेत लिहून दिले़ पुढे मला याची गोडी निर्माण झाल्याचे हाजी गुलाब बाबुलाल पठाण-नगीनावाले सांगितले.
बॉलपेन, पट्टीचा वापर करुन कुरआन शरीफ लिहिण्यास सुरुवात केली. पण पहिल्या प्रयत्नात ते शक्य झाले नाही़ कुरआनात एका पानामध्ये १३ ओळी होत्या मात्र लेखन बारीक मोठे झाल्याने एका पानावर कधी ९ तर कधी ११ ओळी लिहूनही जागा शिल्लक राहू लागली, त्यामुळे पहिला प्रयत्न वाया गेला.
चिकाटी न सोडता पुन्हा दुसऱ्यावेळी कुरआन लिहिण्यास सुरुवात केली़ यावेळी मात्र हूबेहूब अक्षरे येऊ लागली़ कुरआनात एका ओळीत जेवढे शब्द आहेत तेवढेच शब्द त्याच ठिकाणी लिहिले़ अगदी साक्षांकित प्रत केल्याप्रमाणे उत्कृष्ट लेखन झाले़ लिहिण्यासाठी ठराविक वेळ ठरविली नाही़ जेव्हा लिहिणयस बसत असे तेव्हा वजू (हातपाय धुवून) करुन लिहिण्यास सुरुवात करीत़ मग कधी १२ तास तर कधी २ तास़ जोपर्यंत थकवा येत नाही तापर्यंत लिहिती असे़ कुरआन शरीफ लिहिण्याची सुरुवात पवित्र हज येथून व्हावी अशी इच्छा होती मात्र काही कारणामुळे ती होऊ कशली नाही़ मात्र कागल येथील गुलाब बाबा, कुडची येथील माँसाहब दर्गा, सायगाव, आवाटीशरीफ, परंडा, हजरत निजामोददीन दर्गाह जवळा, अल्लाउद्दीन बादशहा दर्गाह काटेगाव, गाडेगाव, उस्मानाबाद, शेख फरीद शक्करगंज गडशरीफ, महिबुब सुभानही दर्गाह बार्शी, वैराग अशा अनेक ठिकाणच्या दर्गाह येथे बसून कुरान शरीफ लिहून पूर्ण केले़
असा आहे हस्तलिखित कुरान
या कुरआनात ८४८ पाने, ६ हजार ६६६ वाक्ये (आयाते), ११४ सुरे, १४ सज्दे आहेत़ अक्षराची कमीअधिक जाडी, गोलाकारपणा, कुठे सरळरेशा अगदी मुळ पुस्तकाप्रमाणेच हुबेहूब अक्षरे कोरुन काढली आहेत़ यातून अरबी भाषेची प्राथमिक ओळखही झाल्याचे त्यांनी सांगितले़
नगीनावाले अशी ओळख
इस्लाममध्ये मुलींना, महिलांना फार मर्तबा आहे. हाजी गुलाब यांना चार मुले व एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव नगीना असे होते. त्यांनी आपल्या सायकल दुकानचे नाव नगीना सायकल मार्ट असे ठेवले़ एका मुलाने टायरच्या दुकानाचे नाव नगीना टायर्स, दुसऱ्या मुलाने इंजिनिअरिंग वर्क्सचेही नाव नगीना इंजिनिअरिंग वर्क्स असे ठेवले आहे़ त्यांच्या जेवढ्या फर्म आहेत त्यांचे नाव नगीना ठेवल्याने बार्शीत त्यांना नगीनावाले नावानेच ओळखले जाते.
आयुष्यात स्मराणात राहिल असे कार्य माझ्या हातून अल्लाहने करवून घेतले आहे. ही प्रत आपण धार्मिक उच्चशिक्षितांच्या मदरशात मुंबई किंवा रत्नागिरी येथे जाऊन खात्री करुन घेणार आहे, त्यानंतरच माझे हे पवित्र काम पूर्ण होईल.
- हाजी गुलाब बाबूलाल पठाण-नगीनावाले,
हस्तलेखक, बार्शी