जातीच्या नावावर डोकी फुटताहेत- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:01 AM2018-07-28T02:01:39+5:302018-07-28T02:02:22+5:30
लहान मुलेही जातीविषयक बोलू लागली, महाराष्ट्राला प्रबोधनाची गरज; राज ठाकरे यांची खंत
पुणे : ‘लहान मुले आता आपआपसांत जातीविषयक गोष्टी बोलु लागली आहेत. आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रबोधनाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सैनिकांत सर्व जातीची माणसे होती. त्याच स्वराज्यात आता जातीच्या नावावर एकमेकांची डोकी फोडली जात आहेत, अशी खंत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मनसेच्या मेळाव्यात शुक्रवारी बोलताना पुढील काळात महाराष्ट्राचा बिहार, उत्तरप्रदेश की झारखंड करणार असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. सध्या जातीय वातावरणात ढवळुन निघालेल्या सामाजिक वास्तवाकडे राज यांनी लक्ष वेधले.
भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी हा काही गुरुपौर्णिमेचा मेळावा नसल्याचे स्पष्ट केले. आपल्याला रस्त्यावर जे काही होर्डिंग दिसले तेव्हा स्वत:लाच आपण जात असलेला मेळावा गुरुपौर्णिमेनिमित्त आहे, असे कळले. अशी मिश्किल टिप्पणी
त्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर आमदार शरद सोनवणे, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, नगरसेवक वसंत मोरे, गजानन बाबर, रणजित शिरोळे, रुपाली ठोंबरे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाने धर्म घरात सांभाळावा...
मुस्लिम समाजाला अजानकरिता लाऊडस्पीकरची काय गरज आहे? त्यांना लाऊडस्पीकर लावून कुणाला कळवायचे आहे, नमाज पढण्याकरिता पूर्ण रस्ते अडविण्याची काय गरज आहे, नमाज पढायचा आहे तो ज्याने त्याने आपल्या घरी पढावा. प्रत्येकाने आपआपला धर्म घरात सांभाळावा. उगाचच दुसºयाने तिसºयाला सांगायला जाऊ नये. या शब्दांत धर्माच्या नावाने राजकारण करणाºयांना फटकारले.
चार वर्षांनंतर राम मंदिर आज आठवले का?
४ वर्षात तुम्हाला आज राम मंदिर आठवले का? असा सवाल ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्चितपणे बांधले गेले पाहिजे पण निवडणुका झाल्यावर, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा भाजपाने पुन्हा समोर आणला आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्या कापडाचे काय झाले?
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते असताना सभागृहाबाहेर गळयात एक कापड लटकवून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी घोषणा देत असत. आता तर सत्तेत असताना देखील आरक्षण मिळत नाही. तेव्हा गळ्यातील त्या कापडाचे काय झाले? अशी टीका राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर
टीका केली.
राहूल गांधींच्या मिठीने काय फरक पडणार होता?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेवर बोलताना राहुल गांधींच्या मिठीने काय फरक पडणार होता असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. नरेंद्र मोदी देशविदेशात इतक्या जणांना मिठ्या मारतात असा टोलाही त्यांनी लगावला.