माउंट कारमेलचे प्रिन्सिपल ‘हाजीर हो’, बालहक्क न्याय समितीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:27 AM2018-01-14T03:27:35+5:302018-01-14T03:27:51+5:30
शहरातील प्रसिद्ध असलेल्या माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला चांगलेच महागात पडले.
- सचिन राऊत
अकोला : शहरातील प्रसिद्ध असलेल्या माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला चांगलेच महागात पडले. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राम नगरातील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाचा मुलगा माउंट कारमेल शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळले, यावरून प्रचंड वादंग झाल्यानंतर प्रिन्सिपलने विद्यार्थ्यास नोटीस देऊन शाळेतून कमी करण्याचे नमूद केले; मात्र हा प्रकार मुलाच्या वडिलांना खटकल्याने त्यांनी बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केली.
त्यावर चौकशी झाल्यानंतर समितीने प्रिन्सिपलला बालहक्क न्याय समितीसमोर १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रामदासपेठ पोलीसही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
सिगारेटचे पाकीट इम्पोर्टेड
सदर विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळलेले सिगारेटचे पाकीट हे सौदी अरेबियातील असल्याचे समोर आले आहे. ते त्याच्या दप्तरात कसे काय आले, हा मोठा प्रश्न असून, सदर प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नोटीसमध्ये असा उल्लेख
प्रिन्सिपलने या विद्यार्थ्याच्या घरी एक नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये विद्यार्थ्यास शाळेतून कमी करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. मुलगा सिगारेट ओढत असल्याचे सांगत त्याच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे त्याचे वडील संतापले; मात्र त्यांनी या प्रकरणात घाई न करता मुलाला धीर देत प्रकरणाच्या खोलात गेले. मुलगा निर्व्यसनी असल्याचे समोर आले. पित्याने मुलावर राग काढला असता, तर प्रकरण वेगळ्याच दिशेने गेले असते, हे निश्चित.