नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे शोभेची बाहुली
By admin | Published: November 13, 2015 11:49 PM2015-11-13T23:49:19+5:302015-11-14T00:30:48+5:30
फैयाज : देवल स्मारक मंदिरच्यावतीने ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल’ पुरस्कार प्रदान
सांगली : नाट्यपंढरी सांगलीतील संगीत नाट्य जगतातील दोन मानाचे ‘भावे आणि देवल’ पुरस्कार मला मिळाले, हे माझे भाग्य असून, नाट्य चळवळीच्या उर्जितावस्थेसाठी नाट्यरसिकांकडून वारंवार प्रगतीची मागणी होत असते. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षाला नसलेले अधिकार आणि निधीच्या कमतरतेअभावी इच्छा असूनही नाट्य चळवळीसाठी काही करु शकत नसल्याची खंत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि नामवंत नाट्यकलाकार, गायिका फैयाज यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
देवल स्मारक मंदिरच्यावतीने ‘नाट्याचार्य गोविंंद बल्लाळ देवल’ पुरस्कार फैयाज यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेश साखवळकर होते. आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
फैयाज म्हणाल्या की, येत्या १५ नोव्हेंबरला माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना, संगीत नाटक क्षेत्रातील दोन महत्त्वाचे ‘विष्णुदास भावे’ व ‘देवल’ पुरस्कार मिळाले. पुरस्काराने काम करण्याची उमेद दुपटीने वाढते. नाट्य संमेलनाची अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नाट्य कलाकारांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मात्र, अध्यक्षा म्हणून काहीच अधिकार नसल्याने, केवळ सत्कार स्वीकारण्यात वेळ जातो. या पदाचा नाट्य चळवळीच्या प्रगतीसाठी फायदा होत नाही. नाट्य क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल त्या म्हणाल्या की, नाट्यक्षेत्रात काम करणारे नवीन कलाकार केवळ अभिनय, गायन किंवा व्यक्तिमत्त्वावर भर देतात. मात्र, गायकाकडे ज्याप्रमाणे रियाज आवश्यक आहे, त्यापध्दतीने कलाकाराकडे अभिनय, गायन अणि व्यक्तिमत्त्वाचा मिलाफ आवश्यक आहे. सध्या नाट्यक्षेत्रात अभिनयाच्या कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीत, ही चिंताजनक बाब असून अभिनयात चिंतन, मनन आवश्यक आहे.
यावेळी सुरेश साखवळकर यांच्याहस्ते फैयाज यांना ‘देवल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. गाडगीळ म्हणाले की, सांगली ही नाट्य पंढरी असून या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील. नाट्यरसिकांसाठी विश्रामबाग येथे दर्जेदार नाट्यगृह उभारण्यात येईल.
देवल स्मारक मंदिरचे अध्यक्ष शरद बापट, अंजली भिडे, चंद्रकांत धामणीकर, शशांक लिमये, संजय रुपलग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रसिकांचे प्रेम महत्त्वाचे...
अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकाराला रसिकांचे मिळणारे पाठबळ महत्त्वाचे असून अभिनयानंतर मिळणारी दाद लाखमोलाची असते. रसिकांनी त्या कलाकाराकडे पाठ फिरविल्यानंतर तो कलाकार खऱ्याअर्थाने संपतो, अशी खंत व्यक्त करीत, मिळणाऱ्या पुरस्काराने कलाकाराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही फैयाज यांनी सांगितले.