नगराध्यक्ष पदाला मुदतवाढ; इच्छुकांचा भ्रमनिरास
By admin | Published: June 7, 2014 11:13 PM2014-06-07T23:13:08+5:302014-06-07T23:46:17+5:30
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता २६ जून रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी पूर्ण तयारी केलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये भ्रमनिरास झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २६ जून रोजी ९ नगरपालिकांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर या ९ पालिकांचा समावेश आहे. तर येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. नाराजीला सामोरे जाण्याची वेळ अनेक नेत्यांना येण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन ही वेळ निभावून नेण्याच्या तयारीत होते. या ठरावाला मान्यता मिळाल्यामुळे आता नगराध्यक्ष पदाला वाढीव कार्यकाळाचा उपयोग घेता येणार आहे. त्याचा त्यांना फायदा होणार आहे. तर जिल्हा परिषद व नगरपालिका आरक्षण अडीच वर्षाचे केल्यानंतर १९९८ ते २00३ या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे होते. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा पूर्ण होत असताना शासनाने हा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवला होता. त्यानंतर असा कार्यकाळ वाढवण्यात आला नाही; मात्र नगराध्यक्ष पदासाठी हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)