बँक ऑफ महाराष्ट्रची कॉर्पोरेट, कृषी कर्जाची डोकेदुखी कायम..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:12 PM2020-01-21T13:12:35+5:302020-01-21T13:23:42+5:30
बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची थकीत कर्जे बँकेची डोकेदुखी डिसेंबरअखेरीस १३५ कोटी रुपये नफा
पुणे : बड्या कॉर्पोरेट कंपन्या आणि कृषी कर्जाच्या वाढत्या थकबाकीची बँक ऑफ महाराष्ट्रची डोकेदुखी कायम आहे. एकूण १५ हजार ७४६ कोटींच्या थकीत कर्जापैकी एकतृतीयांशाहून अधिक कर्ज या दोन क्षेत्रांतील आहे. मात्र, थकीत कर्जाची वसुली, अंतर्गत खर्चात केलेली कपात यामुळे यंदा बँकेने डिसेंबर २०१९ अखेरीस तब्बल १३५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या चार तिमाहींतील यंदाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी सोमवारी तिसऱ्या तिमाहीचा अहवाल सादर केला. कार्यकारी संचालक ए. सी. राऊत, हेमंतकुमार टम्टा या वेळी उपस्थित होते. बँकेने डिसेंबर २०१८ला असलेल्या तब्बल ३ हजार ७६४ कोटींच्या तोट्याच्या तुलनेत यंदा १३५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तसेच, चालू व बचत खात्यातील रकमेत ६३ हजार ७५६ कोटी रुपयांवरून २६ हजार २४६ कोटींपर्यंत (७.०४ टक्के) वाढ झाली आहे. या काही जमेच्या बाजू आहेत. गेल्या वर्षभरात भारत सरकारने बँकेतील गुंतवणूक ८७ वरून ९२.४९ टक्क्यांपर्यंत वाढविली आहे.
बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची थकीत कर्जे बँकेची डोकेदुखी ठरत आहेत. त्यात डीएचएलएफ, रेलीगेअर यासारख्या कंपन्यांच्या थकीत कर्जांचाही समावेश आहे. डिसेंबर २०१८अखेरीस ३९,२०७ कोटींपैकी ८,२९१ कोटींची (२१.१५ टक्के) बडी कॉर्पोरेट कर्जे थकीत होती. डिसेंबर २०१९अखेरीस ३८,१३१ कोटींपैकी थकीत कर्जाचे प्रमाण ८,८८१ कोटींपर्यंत (२३.२९ टक्के) वाढले आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) साडेबारा हजार कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. त्यावर प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच यातील काही कर्जाची वसुली होईल, असे बँक व्यवस्थापनाकडूून सांगण्यात आले.
डिसेंबर २०१८अखेरीस १४,०९४ कोटींपैकी २,९७१ (१९.८८ टक्के) कोटी रुपयांची कृषी कर्जे थकीत होती. डिसेंबर २०१९अखेरीस १५,६०१ कोटींपैकी ३,५३२ (२२.६४ टक्के) हजार कोटी रुपये थकीत आहेत. गृह, शिक्षण व वाहन या रिटेल (किरकोळ) व लघु व मध्यम उद्योगातील थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात बँकेला यश आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बँकेकडून अधिक पतपुरवठा करण्यात येत असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील पतपुरवठ्यात थोडी घट झाली आहे.
..............
किरकोळ क्षेत्रातील एनपीए
डिसेंबर-२०१८ डिसेंबर २०१९
क्षेत्र दिलेले कर्ज एनपीए टक्के दिलेले कर्ज एनपीए टक्के
गृह १२,८९३ ६४५ ५ १३,९९६ ५८९ ४.२१
शिक्षण १,०९४ ११४ १०.४० १,२०८ ७९ ६.५४
वाहन १,२५८ ४३ ३.४५ १,४४८ ४२ २.८८