‘हेडलीची पत्नी व तहव्वूर राणाला आरोपी करा’
By admin | Published: March 17, 2016 01:13 AM2016-03-17T01:13:18+5:302016-03-17T01:13:18+5:30
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सरकारी वकिलांचा माफीचा साक्षीदार असलेला डेव्हीड हेडलीची पत्नी साजिया गिलानी व तहव्वूर राणा या दोघांनाही खटल्यात आरोपी
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सरकारी वकिलांचा माफीचा साक्षीदार असलेला डेव्हीड हेडलीची पत्नी साजिया गिलानी व तहव्वूर राणा या दोघांनाही खटल्यात आरोपी करा, अशी मागणी लष्कर- ए- तोयबाचा सदस्य अबू जुंदाल याने अर्जाद्वारे विशेष न्यायालयात केली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत हेडलीने त्याची पत्नी साजिया गिलानीने हल्ला झाल्यानंतर अभिनंदनाचा ई- मेल केल्याचे सांगितले. तर हेडलीला त्याची खरी ओळख लपवण्यासाठी भारतात इमिग्रेशन सेंटर सुरू करण्यासाठी तहव्वूर राणा याने मदत केली. त्यामुळे या दोघांनाही या खटल्यात आरोपी करावे, असा अर्ज अबू जुंदाल याने न्या. जी. ए. सानप यांच्याकडे केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी आहे. २६/११ चा हल्ला यशस्वी झाल्यानंतर हेडलीची पत्नी साजिया गिलानी हिने हेडलीला सांकेतिक भाषेत इ-मेल पाठविला. या मेलचा अर्थ खुद्द हेडलीनेच व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या साक्षीत स्पष्ट केला. तसेच तहव्वूर राणा यानेच भारतात आपली खरी ओळख लपवण्यासाठी इमिग्रेशन सेंटर सुरू करण्यासाठी मदत केल्याचेही न्यायालयाला सांगितले. त्याआधारे अबू जुंदालने हा अर्ज केला आहे.