राज्यातील आघाडीत पुण्यावरून बिघाडी?
By admin | Published: January 18, 2017 06:48 AM2017-01-18T06:48:04+5:302017-01-18T06:48:04+5:30
राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली
अतुल कुलकर्णी,
मुंबई- पुणे महापालिका निवडणुकीत जागा सोडण्यावरून राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ताठरपणाची सुरुवात मुंबईतून झाल्याचे सांगत, काँग्रेसचा हा निनावी हल्ला परतवला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते, असा रिपोर्ट गुप्तवार्ता अधिकाऱ्यांनी गृहविभागास दिला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या, तर भाजपापुढे ते आव्हान ठरू शकते, असे मत व्यक्त केले होते. यावर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘आम्ही पुणे महापालिकेत आघाडी करण्याची भूमिका घेतली, पण अजित पवार यांनी ताठरपणा कायम ठेवला आहे. थोडी समजुतीची भूमिका घेतली, तर प्रश्न मार्गी लागू शकतील,’ असेही तो नेता म्हणाला.
यावर तटकरे म्हणाले, ‘काँग्रेसने मुंबईत दोन महिने आधीच ‘आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर केली. त्याला ताठरपणा म्हणायचे नाही का? त्यांच्या या भूमिकेमुळेच आम्ही मग मुंबईत आमच्या काही उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. आमची राज्यभर आघाडी करण्याची भूमिका आहेच, पण दोघांनीही एका पातळीवर येऊन तातडीने चर्चा केली पाहिजे,’ असे तटकरे म्हणाले.
या बैठकीबद्दल विचारले असता, अशोक चव्हाण आघाडीचे निर्णय जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य ते प्रस्ताव पाठवल्यास आम्ही त्याला होकारच देऊ. वास्तवाची जाणीव ठेवून निर्णय घेतले जातील, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारदेखील आघाडीबद्दल सकारात्मक असल्याचे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीसोबत जायचे की नाही, असे थेट विचारले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी बघा, सगळ्यांचे काय मत आहे तसे करा, असे गोलमोल उत्तर दिल्याचे समजते.
पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवर जुना राग आहे, पण आता रागलोभाच्या पलीकडे जाऊन निवडणुकांकडे पाहावे लागेल, असे सांगून व्यावहारिक भूमिका घ्यावी लागेल, असे मत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांंनी मांडल्याचे समजते.