मुख्याध्यापकांनीच दडपली तक्रार !
By admin | Published: November 7, 2016 05:55 AM2016-11-07T05:55:54+5:302016-11-07T05:55:54+5:30
आपला लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारी पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याधापकांकडे वेळोवेळी केली होती
खामगाव (जि.बुलडाणा) : आपला लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारी पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याधापकांकडे वेळोवेळी केली होती; मात्र मुख्याधापकांनीच हा सर्व प्रकार दडपल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी इत्तुसिंग काकुसिंग पवार याच्याविरोधात या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक भरत लाहुडकर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या; मात्र लाहुडकर यांनी या तक्रारीची दखल न घेता, विद्यार्थिनींनाच याबाबत बाहेर वाच्यता न करण्याचा दम दिला होता, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापक भरत लाहुडकार व विजय कोकरे अद्याप फरार आहे.
आश्रमशाळेची मान्यता रद्द
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाने या आश्रमशाळेची
मान्यता रद्द केली आहे. मान्यता रद्द केल्याचा आदेश रविवारी या आश्रमशाळेत धडकला.
आदिवासी विकासमंत्री विष्णू
सवरा यांनी शुक्रवारी आश्रमशाळेला भेट दिली.
पाहणी दरम्यान, येथे कुठल्याही सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. याती गंभीर दखल घेत त्यांनी शुक्रवारीच खामगावात आश्रमशाळेची मान्यता
रद्द करण्याची घोषणा केली
होती. मुख्याध्यापकासह शाळेतील आठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात
आले आहे. (प्रतिनिधी)
नराधम इत्तूसिंगची दमदाटी
नागपूर : मुख्य आरोपी नराधम इत्तूसिंग पवार या आश्रमशाळेतील मुलींना वारंवार दमदाटी करायचा. रात्रीच्या वेळी तो खोलीचा दार उघडे ठेवण्यास सांगायचा. एखाद्या मुलीने याकडे कानाडोळा केला तर तिला दुसऱ्या दिवशी तो मारहाण करून त्रास देत होता, असे चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य गुन्हे अन्वेषणच्या (नागपूर विभाग) प्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अवघ्या सात मुलींच्या जबाबातून दोघींवर अत्याचार झाल्याचे पुढे आले.
आश्रमशाळेत एकूण १०४ मुली वास्तव्याला आहेत. दिवाळीच्या सुटीमुळे बहुतांश मुली आपापल्या गावाला गेल्याने आणि त्या परत येणार की नाही, याची खात्री नसल्यामुळे चौकशी पथके त्या-त्या गावांत रवाना करण्यात आली आहे.
जलदगती न्यायालयात खटला चालवा - मोघे
आश्रमशाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचा प्रकार हा अतिशय गंभीर आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके यांनी रविवारी आश्रमशाळेला भेट दिली. त्यानंतर खामगाव येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.
प्रशासकीय यंत्रणेसोबतच आश्रमशाळा व्यवस्थापन आणि संचालन करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. झालेल्या घटनेबाबत सूक्ष्म निरीक्षण करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी प्रा. पुरके यांनी यावेळी केली.