३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2015 03:02 AM2015-11-07T03:02:22+5:302015-11-07T03:02:22+5:30
पालकांनीही दक्षता घेणे अनिवार्य.
अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील शाळांना देण्यात आलेला ३ महिन्यांचा कालावधी येत्या ३0 नोव्हेंबर रोजी संपणार असून, त्यानंतरही दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, संबंधित मुख्याध्यापकास जबाबदार धरल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक असल्याने, विद्यार्थ्यांना पाठदुखी, सांधे दुखी, स्नायू आखडणे, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण, इत्यादी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने, भविष्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १0 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, तसेच शाळांमध्ये ग्रंथालयाच्या धर्तीवर ह्यदप्तरालयह्ण सुरू करावे,अशा प्रकारच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शाळांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शाळांकडे ३0 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, शाळेचे मुख्याध्यापक, तसेच नियामक मंडळाचे नामनिर्देशित संचालक जबाबदार राहणार आहेत. शाळा व्यवस्थापनासोबतच पालकांनीही यासाठी विशेष दक्षता घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.