आरोग्य जनजागृतीची चळवळ
By Admin | Published: June 9, 2016 01:09 AM2016-06-09T01:09:48+5:302016-06-09T01:09:48+5:30
सध्याच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि ताणतणावाची झाली आहे
पुणे : सध्याच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि ताणतणावाची झाली आहे. ताणतणावांना सामोरे जाताना अनियमित वेळापत्रकामुळे व्यायाम, आहाराकडे आणि पर्यायाने तब्येतीकडे दुर्लक्ष होते. याची परिणती मधुमेह, रक्तदाब, स्थूलता असे आजार बळावण्यामध्ये होते.
या विकारांवर औषधोपचार करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात. सामान्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी यूएचएफएफ या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील बहुतांश जिम व्यावसायिक एकत्र आले आहेत. या संस्थेद्वारे त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आरोग्य जनजागृती चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे.
संस्थेच्या सर्व सदस्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर या चळवळीचे स्वरूप, सामान्यांच्या तब्येतीच्या वाढत्या तक्रारी, त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी गोल्ड जिमचे रोहन पुसाळकर, स्मिथ जिमच्या स्मिता शितोळे, फायबर फिटनेस जिमच्या आरती पांडे आणि मनोज उप्रेती, तळवलकर हायफायच्या सीमा गुलाणे, हरिश गुलाणे, शीतलकुमार कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. संस्थापक आणि संचालक रोहन पुसाळकर म्हणाले, ‘‘समाजासाठी काय करता येईल, यासाठी अनौपचारिक चर्चा सुरू झाल्या. सध्या हृदयरोग, मधुमेह, स्थूलता यांसारखे आजार बळावत आहेत. बदलती जीवनशैली हे यामागचे प्रमुख कारण आहे. आरोग्याविषयीच समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने संस्थेने ‘कमिटमेंट फॉर पीपल’ ही मोहीम हाती घेतली आहे.’’
या मोहिमेविषयी सांगताना स्मिता शितोळे म्हणाल्या, ‘‘वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही लोकांना वेळ मिळत नाही. मात्र, तुमच्या दैनंदिन जीवनात काही क्षण तरी व्यायामासाठी देणे नितांत गरजेचे आहे. याच विषयाची जनजागृती या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे.
यासाठी शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट कंपन्या अशा विविध ठिकाणी तेथील लोकांकडून आरोग्यासंबंधीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यामध्ये आपली जीवनशैली, आहाराच्या सवयी, तब्येतीच्या तक्रारी, व्यायाम
याची माहिती संकलित केली जाणार आहे.’’
मनोज उप्रेती आणि आरती पांडे म्हणाल्या, ‘‘आपल्याकडील लोक खाण्या-पिण्यावर, खरेदीवर, मौजमजेवर भरपूर पैसे खर्च करतात. आहाराच्या सवयीमुळे तब्येत बिघडते. औषधोपचारांसाठी अजून पैसे खर्च होतात. हा सगळा हिशेब पाहता, सुरुवातीपासून व्यायामात सातत्य बाळगले आणि आरोग्याची काळजी घेतली तर खर्च कमी होऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. यादृष्टीने कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आणि ‘कमिटमेंट फॉर पीपल’ या चळवळीला मूर्त स्वरुप देण्यात येत आहे.’’
हरिश आणि सीमा गुलाणे म्हणाल्या, ‘‘आरोग्याची जनजागृती ही सामुदायिक चळवळ आहे. सामुदायिक प्रयत्नातून आरोग्याची चुरस निर्माण झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.’’ शीतलकुमार कोल्हे म्हणाले, ‘‘या मोहिमेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. समाजातील जास्तीत जास्त लोकांनी आरोग्याबाबत जागरुकता बाळगावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. तब्येतीची काळजी हे प्रत्येकाचे प्राधान्य असले पाहिजे.’’
>फिट अँड फाईन राहण्यासाठी दैनंदिन वेळापत्रकात काय बदल करणे आवश्यक आहे, स्वत:च्या आवडीनुसार कोणते व्यायामप्रकार अवलंबता येतील, त्यासाठी कशा प्रकारे वेळ देता येऊ शकतो आदी मार्गदर्शन केले जाणार आहे. संबंधित व्यक्ती हे बदल कशा प्रकारे स्वीकारत आहेत, याचा पाठपुरावा केला जाईल. सहा महिन्यांनी त्याचे विश्लेषण करून संबंधितांना योग्य मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत केले जाईल.
- स्मिता शितोळे
>सध्या शिक्षण, कृषी, सराफ आदी क्षेत्रांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मात्र, हेल्थ आणि फिटनेसच्या क्षेत्रात अशी कोणतीच पावले अद्याप उचलली गेली नाहीत. त्यामुळे शहरातील नामवंत जिमच्या संचालकांनी एकत्र येऊन असे व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार केला. तळवलकर जिमचे संचालक मधुकर तळवलकर यांच्या पुढाकाराने यूएचएफएफची स्थापना झाली.- रोहन पुसाळकर
यूएचएफएफ या संस्थेतर्फे याआधी रक्तदान, फिटनेस वॉक, तरुणांशी फिटनेसबाबत संवाद, धान्य, पुस्तकेवाटप आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिममध्ये फ्री वर्कआऊट, डान्स बेस्ड वर्कआऊट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देण्यावर भर दिला जातो. मैदानी खेळ, व्यायाम आणि जिम यांची योग्य सांगड घातल्यास आरोग्याचा समतोल जपता येतो, असे मत जिम संचालकांनी व्यक्त केले.