हेल्थ केअर मॉडेल जिल्ह्यात मराठवाड्याला वाटाण्याच्या अक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:09 PM2017-10-03T17:09:39+5:302017-10-03T17:15:27+5:30
राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा जर समावेश झाला असता, तर मागासलेल्या या विभागाच्या जखमेवर फुंकर मारल्यासारखे झाले असते.
- विकास राऊत
औरंगाबाद, दि. ३ : राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा जर समावेश झाला असता, तर मागासलेल्या या विभागाच्या जखमेवर फुंकर मारल्यासारखे झाले असते.
मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि औरंगाबाद यापैकी एकही जिल्हा शासनाला मॉडेलमध्ये घ्यावासा का वाटला नाही. याबाबत मराठवाडा विकास मंडळ सदस्यांनी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खरमरीत पत्र दिले आहे.
मुळातच ‘मराठवाड्याचे आरोग्य’ हा विषय शासनाच्या लेखी दुर्लक्षित राहिलेला आहे. आरोग्याच्या सर्वच इंडिकेटरमध्ये मराठवाडा मागे आहे.
प्राथमिक आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आहे. ३० ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. पायाभूत सुविधांची वाईट अवस्था आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. किडनी, हृदय, लिव्हर आदी आजारांवरील उपचारांसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे रुग्णांना जावे लागते. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात असणे गरजेचे आहे. मानसोपचारासाठी येरवडा, ठाणे, नागपूरला येथील रुग्ण भरती करावे लागतात. अशी परिस्थिती असताना शासनाने मराठवाड्यातील आरोग्य विकासाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
मराठवाड्याचा समावेश करा
मंडळातील तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी अर्थमंमत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मॉडेल आरोग्य जिल्ह्याची संकल्पना चांगली आहे. विदर्भ, कोकण इत्यादी ठिकाणांसोबत मराठवाड्याचाही त्यात समावेश असावा. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा समावेश होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत मराठवाड्याचा अनुशेष बराच मोठा आहे. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे विकासगंगा त्या प्रदेशात जास्त प्रमाणात वळविण्यात येत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
चांदा ते बांदा हा विकासमार्ग मराठवाड्यातून का जात नाही. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याला वगळणे योग्य वाटत नाही. विभागातील वैद्यकीय शिक्षण सुविधा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे. मराठवाडा विकास मंडळातर्फे एक्स-रे ते कॅथलॅब टेक्निशियनपर्यंत तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात उभारणे गरजेचे आहे.