आरोग्य यंत्रणेला घरघर

By admin | Published: June 5, 2017 02:56 AM2017-06-05T02:56:31+5:302017-06-05T02:56:31+5:30

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे.

The health care system | आरोग्य यंत्रणेला घरघर

आरोग्य यंत्रणेला घरघर

Next

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे. आधीच रिक्त पदांमुळे आरोग्य विभागाचे ठोके वाढलेले असतानाच असुविधांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये सामान्यांना परवडणारी ठोस पर्यायी आरोग्य व्यवस्थाच नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत
आहे.
रायगड जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी, यासाठी कोणतेही लोक प्रतिनिधी कणखर पावले टाकताना दिसून येत नाही. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सुदृढ असावी, असे कोणालाच वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २६ लाखांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे महाड-१, महाड-२, रोहे, उसर, नागोठणे, विळेभागाड, तळोजा आणि पाताळगंगा असे सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार ७०२ सूक्ष्म उद्योग आहेत, तर ८९४ लहान, ३३ मध्यम आणि २५४ मोठे असे एकूण दोन हजार ८८३ प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा पसारा असताना मात्र येथील आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे.
रायगड जिल्ह्यासाठी एक जिल्हा रु ग्णालय, पाच उपजिल्हा रु ग्णालये, आठ ग्रामीण रु ग्णालये आहेत. या रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भेडसावत आहे. ६९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचा थेट परिणाम सामांन्याच्या आरोग्यावर होत आहे. त्यातच १८ वैद्यकीय अधिकारी हे अनधिकृत गैरहजर असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, रेडिआॅलॉजिस्ट यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे येथे शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत. एखाद्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रि येसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी मुंबईची वाट धरावी लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांना मुंबईमध्ये जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची तेथे परवड
होते. अधिकच्या उपचारासाठी जाताना रस्त्यातच प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णाचा मृत्यू प्रवासात होण्याचेही प्रकार घडले आहेत.
लवकरच सुधारणा
-डॉ. अजित गवळी
जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेले सिटी स्कॅन मशिन रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. आपल्याकडे आधीच मशिन आल्याने मंजूर झालेले मशिन त्यांना देण्यात आले आहे. तेथील नागरिकांनाही त्याची गरज आहे. आपल्याकडे सिटी स्कॅन करण्यासाठी रु ग्णांची गर्दी असते.
सध्या रु ग्णांना खासगी सेवा घ्यावी लागत आहे. आपल्याकडील सिटी स्कॅन मशिन रुग्णांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या पैशांसह वेळेचीही बचत होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित असुविधेबाबत लवकरच सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्यात हजर होण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश काढण्यात येतात. मात्र, बरेच अधिकारी हजर होऊन जिल्ह्यातून पळ काढीत आहेत. याची कारणे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाहीत. १८ वैद्यकीय अधिकारी परस्पर रजेवर गेले आहेत. याबाबत जिल्हा रु ग्णालय प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.
रायगड जिल्हा सामान्य रु ग्णालयात वर्ग-एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९ पदे आहेत. त्यापैकी ९ पदे भरली आहेत. मात्र, त्यामधील एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहे. वर्ग-दोनच्या १०० पदांपैकी ५९ पदे भरली आहेत. मात्र, त्यातील प्रत्यक्षात ४२ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. १७ वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहिले आहेत.

Web Title: The health care system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.