आरोग्य विभागाच्या परीक्षा आता २४, ३१ ऑक्टोबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:56 AM2021-09-28T05:56:25+5:302021-09-28T05:57:07+5:30
यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा घेण्यात आला होता निर्णय.
मुंबई : आरोग्य विभागातील गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोबरला, तर गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सोमवारी केली.
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील २,७३९ आणि ‘ड’ संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. १,५०० केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षार्थींना ९ दिवस अगोदरच प्रवेशपत्र दिले जातील. तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, केंद्रांची माहिती आणि उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्या, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या.
तक्रारींची चौकशी करणार
या परीक्षेत पास करून देण्यासाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे, तसेच एक ऑडिओ क्लिपही फिरत आहे. या क्लिपची सत्य-असत्यता तपासून पाहिली जाईल, तसेच कोणतीही तक्रार आली, तर चौकशी केली जाईल. काही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच घेतली जाईल, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.