आरोग्य विभागाने काढली ११ हजार पदांची जाहिरात, रिकामी पदे भरण्यासाठी तत्काळ भरती मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:23 AM2023-08-29T05:23:45+5:302023-08-29T05:24:08+5:30
आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले.
मुंबई : कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदावर बसवून अतिरिक्त कार्यभार देण्याचा संसर्ग झालेल्या राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अखेर शुद्धीवर आला आहे. संचालक पदापासून ते शिपाई पदापर्यंतच्या मोठ्या प्रमाणात या विभागात जागा रिकाम्या असल्याने रुग्णांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत रिकामी पदे तत्काळ भरण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील १० हजार ९४९ पदांसाठी जाहिरात काढली आहे.
आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. आरोग्य विभागात संचालकपदापासून ‘गट क’ आणि ‘ड’ स्तरावरील हजारो पदे रिक्त असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागावर टीकेची झोड उठली होती. अखेर सोमवारी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होतील, असे स्प्ष्ट केले.
वरिष्ठ अधिकाऱ्याची पदे केव्हा भरणार?
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात २ संचालक, ४ अतिरिक्त संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही प्रमुख पदे रिकामी आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील अधिकाऱ्यांची २३८ पदेही रिक्त आहेत.