आरोग्य विभागाची ५० टक्के भरती सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:49 AM2020-12-16T02:49:49+5:302020-12-16T02:50:03+5:30
राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात
मुंबई : राज्यात आरोग्य विभागाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.
राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. देशपातळीवर ज्या १४ राज्यांची चर्चा होत आहे, त्यात महाराष्ट्र नाही, असे सांगून टोपे म्हणाले, डेथ ऑडिट कमिटी जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूच्या कारणांची सखोल चौकशी करण्यासाठी ही कमिटी गेले काही महिने काम करीत आहे. केंद्र सरकारने कोरोना तपासणीचे दर ४५०० रुपये ठेवले होते, ते उद्यापासून ७८० रुपये करण्यात येतील, अशी घोषणाही टोपे यांनी केली. बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल. त्यासाठीचे ट्रेनिंग सुरू आहे. कोल्ड चेनची व्यवस्था पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.