आरोग्य संचालक पवार यांची अखेर गच्छंती
By admin | Published: December 10, 2015 03:15 AM2015-12-10T03:15:19+5:302015-12-10T03:15:19+5:30
राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदी डॉ. सतीश पवार यांची झालेली निवड बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली. संचालकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने नव्याने प्रक्रिया राबवावी
नागपूर : राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदी डॉ. सतीश पवार यांची झालेली निवड बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली. संचालकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने नव्याने प्रक्रिया राबवावी, असा आदेश न्या. दीपक मिश्रा आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने दिला.
डॉ. पवार यांची जून २०१३ मध्ये आरोग्य संचालकपदी एमपीएससीने निवड केली होती. मात्र, या निवडीच्या प्रक्रियेला सदर पदाचे एक दावेदार असलेले डॉ. मोहन जाधव यांनी महाराष्ट्र प्रशासनिक लवादाकडे (मॅट) आव्हान दिले होते. या पदासाठीच्या पात्रता निकषात बसत असूनही एमपीएससीने डावलले, असे डॉ. जाधव यांचे म्हणणे होते. मॅटने डॉ. पवार यांची नियुक्ती रद्दबातल ठरविली होती. त्याला डॉ. पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने मॅटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर डॉ. पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांची निवड आज रद्दबातल ठरली. डॉ. पवार हे आरोग्य सेवा संचालनालयामध्ये मोठे प्रस्थ मानले जाते. प्रत्येक अपिलाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे डॉ. पवार इतके दिवस पदावर राहू शकले होते. मात्र आता त्यांना हे पद सोडणे अपरिहार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)