दोषींवर कडक कारवाईस आरोग्य संचालकांची मंजुरी !
By admin | Published: June 5, 2016 01:07 AM2016-06-05T01:07:00+5:302016-06-05T01:07:00+5:30
अकोल्यातील जुने शहर भागातून चालविण्यात येत असलेल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (टीएचओ) गुन्हा दाखल
- सचिन राऊत, अकोला
अकोल्यातील जुने शहर भागातून चालविण्यात येत असलेल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (टीएचओ) गुन्हा दाखल करण्यास आरोग्य संचालकांनी शुक्रवारी रात्री मंजुरी दिली. या प्रकरणात राज्यातील ८ ते १० डॉक्टरांच्याही मुसक्या आवळण्यात येणार आहेत.
जुने शहरातील वाल्मीक चौक शिवनगर येथील रहिवासी आनंद भगवान जाधवकडून संतोष शंकर गवळीने २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, संतोषने चार महिन्यात रक्कम परत न केल्याने आनंदने त्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर, किडनी देण्याच्या मोबदल्यात गवळीला आणखी पैशाचे आमिष देण्यात आले. हतबल झालेल्या गवळीने अखेर किडनी देण्याची तयारी दर्शविली.
या प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर अशाच प्रकारे संतोष कोल्हटकर याचीही किडनी काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जुने शहर पोलीस स्टेशनमध्येही आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात १५ ते १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
- डॉ. सतीश पवार यांचे मार्च महिन्यात निलंबन झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य संचालकपदावर डॉ. गौरी राठोड यांची नियुक्ती झाली. किडनी तस्करी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी या प्रकरणातील दोषींवर ‘टीएचओ’ लावण्यास हिरवा कंदील दिला आहे.
आरोग्य संचालकांकडून याबाबतचे पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त होताच या प्रकरणातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकिशोर मीणा,
पोलीस अधीक्षक, अकोला