आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या पीएविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By admin | Published: June 21, 2016 02:54 PM2016-06-21T14:54:21+5:302016-06-21T15:56:39+5:30
वैद्यकीय महिला अधिका-याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - वैद्यकीय महिला अधिका-याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने काल माळी यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर माळी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. अखेर आज माळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी महिलेशी माळी यांनी गैरवर्तणूक केली होती. याबाबत संबंधित महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर आज मुंबईत येऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात माळींविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. चार तास ही महिला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होती, त्यानंतर कुठे पोलिसांनी तक्रार दाखल करवून घेतली. पण रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. सूत्रांनी सांगितले की, ‘आपण तक्रार करू नका’असा फोन एका मंत्र्यांने संबंधित डॉक्टर महिलेस केला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, कथित घटना १६ मार्चला घडलेली होती. आता तिने तीन महिन्यांनंतर तक्रार केलेली आहे. तिची शाहनिशा करुनच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)
दरम्यान सध्या ही वैद्यकीय महिला अधिकारी आझाद मैदानात उपोषणास बसली असून माळी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. सावंत मुख्यमंत्र्यांकडे
आरोग्य खात्यात बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि पीए सुनील माळीने एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा केलेला कथित विनयभंग या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सफाई दिली होती.. विनयभंगाच्या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता करतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
थातूरमातूर कारवाई
बदल्यांचे घोटाळे आणि विनयभंगासारख्या तक्रारी असताना सुनील माळी यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते उपजिल्हाधिकारी असून प्रतिनियुक्तीवर मंत्री कार्यालयात आलेले आहेत. तथापि, आरोग्य मंत्री सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका मी घेणार नाही पण कुणावर अन्यायदेखील होऊ देणार नाही.