आरोग्यमंत्र्यांना धरले धारेवर!
By admin | Published: June 8, 2017 03:17 AM2017-06-08T03:17:48+5:302017-06-08T03:17:48+5:30
कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी कुपोषण मुक्त आरोग्य अभियानाची बैठक रजपूत हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र यावेळी कुपोषण हे केवळ औषधोपचाराने दूर होणार नसून यासाठी दारिद्रय निर्मूलनाचा प्रश्न हाती घेणे आवश्यक असल्याचे मत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मांडून मंत्री महोदयांना वास्तव जाणवून दिले.
जिल्ह्यातील रोहयो सक्षम नसणे, रिक्त पदे न भरणे, अंगणवाडी सेविका मानधन, पोषण आहार देयके थकित ठेवणे यासारखे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ आरोग्य सेवक आणि अत्यल्प मानधनावरील अंगणवाडी सेविका व आशा ताई यांच्यावर भार टाकून हे अभियान यशस्वी होणार नाही असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, आदिवासी विकास जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, सहाय्यक आरोग्य संचालक रावखंडे आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी होते.
१९९२ पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांना कुपोषणाने घट्ट विळखा घातला असून दरवर्षी विविध योजना राबवून ते थांबविण्याचा अशस्वी प्रयत्न सुरू आहे. पावसाळ्यात येथील कुपोषित आदिवासीबांधवांची आकडेवारी वाढणार आहे. ‘चला पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करूया’ या घोषणेने सुरू केलेल्या कुपोषण मुक्त पालघर अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत आधीच उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते विजय जाधव यांनी मंत्री डॉ सावंत यांनी अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर त्यांच्यावर टाकलेल्या अधिक जबाबदाऱ्या या त्यांना दिल्या जाणाऱ्या तटपुंज्या मानधनात कशा पार पडणार? असा सवाल केला. जाधव यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशावर्कर यांच्या व्यथा आणि पोषक आहाराची थकीत बिलं याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. आता पर्यंत झालेल्या दौऱ्यांनी काय निष्पन्न झाले असाही सवाल त्यांनी केला. तसेच बैठक संपल्यानंतर आशा कार्यकर्र्त्यांंनी मंत्र्यांना निवेदन देऊन १०८ अॅम्ब्युलन्स लवकरच मिळावी, कारण ती नसल्याने आम्हाला पदरमोड करून रूग्णांना वाहनं उपलब्ध करुन द्यावे लागतात. त्याचे देयके सुध्दा आम्हाला लवकर मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यावेळी डॉ. सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने त्यांची देयके वितरीत करण्याचे आदेश
दिले.
यावेळी श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, गणेश उंबरसडा, सिता घाटाळ, कैलास तुंबडा, मिलिंद थुळे, संतोष धिंडा, कमलाकर भोरे, जमशेद खान ,मनीष भानुशाली, निलेश वाघ, जाणू मोहंडकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
>रिक्त पदांचा प्रश्न
श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या अभावाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षात असतांना विधानसभेत डॉ. सावंत यांनी केलेली भाषणे आणि मागण्यांची आठवण करुन दिली. यावेळी डॉ. सावंत यांनी मी एकटाच असा मंत्री आहे की, ज्याने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या उणिवा दूर करण्याची मागणी केली होती. या रिक्त पदांचा तातडीने आढावा घऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले.