आरोग्य मंत्र्यांच्या ‘पीए’वर गुन्हा
By admin | Published: June 22, 2016 04:08 AM2016-06-22T04:08:23+5:302016-06-22T04:08:23+5:30
महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीवरुन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई : महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीवरुन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकतात.
सुनील माळी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित महिला डॉक्टरने मंगळवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जळगाव येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार महिलेने सोमवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.
हा जामीनपात्र गुन्हा असून तो न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक पोपट यादव यांनी सांगितले. पोलिसांनी सुनील माळींना चौकशीसाठी बोलावले, मात्र ते सोमवारी तसेच मंगळवारीही पोलीस स्टेशनमध्ये आले नाहीत. माळी यांना केवळ सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांचे निलंबन करून अटक करावी, अशी मागणी महिला डॉक्टरने केली आहे. माळी यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांचे राज्यभरातून फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित महिलेला पाठिंबा देत प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा तारूलता टोकस यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली. तत्काळ गुन्हा दाखल करण्याची गरज होती. मात्र चार तास बसवून ठेवल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांना एक फोन आला होता. त्याची चौकशी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी करायला हवी, असेही टोकस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)