Coronavirus: तुम्ही सर्वांना घरी थांबायला सांगता, मग तुमच्याच पक्षाचे मंत्री बाहेर कसे फिरतात? आरोग्यमंत्री म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 07:55 PM2020-03-22T19:55:05+5:302020-03-22T20:09:37+5:30
coronavirus राजेश टोपेंना पत्रकार परिषदेत मलिक यांच्या दौऱ्याबद्दल विचारण्यात आला प्रश्न
मुंबई: कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रवास टाळा, घरीच राहा, असं आवाहन गेल्या आठवड्यापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्यानं करत आहेत. नागरिक घरातून बाहेर पडतच राहिले तर मग आम्हाला नाईलाजास्तव लोकल बंद कराव्या लागतील, असंदेखील टोपे याआधी म्हणाले होते. यानंतर आज रेल्वे मंत्रालयानं सर्व रेल्वे गाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलंय. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन पत्रकारांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला टोपेंनी पुन्हा एकदा केलं. त्यावेळी टोपेंना त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही जनतेला घरीच थांबण्याचं आवाहन करता. मग तुमच्याच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक दौरे कसे काय करतात, असा प्रश्न टोपेंना विचारला गेला.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेले नव्हते, असं स्पष्टीकरण टोपेंनी दिलं. 'नवाब मलिक दौऱ्यावर गेले असतील, तरी त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. ते परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ते तिथे गेले असतील,' असं टोपे म्हणाले.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि रुग्णांच्या संख्येबद्दल माहिती दिली. राज्यात १० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झालीय. यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या करोना बाधित ६३ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी ४१ वर्षीय महिला करोना बाधित आढळली, तिचे चार जवळचे नातेवाईक आज करोना बाधित आढळून आल्याचं त्यांना सांगितलं.