आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:55 PM2021-02-18T23:55:02+5:302021-02-19T06:33:30+5:30
Coronavirus : Maharashtra health minister Rajesh Tope tests positive for COVID-19 : राजेश टोपे यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra health minister Rajesh Tope tests positive for COVID-19)
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी", असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
राज्यात रुग्ण वाढू नयेत म्हणून खबरदारी
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील, असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. याशिवाय अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे.