Coronavirus: महाराष्ट्र लवकरच मास्कमुक्त होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:06 PM2022-02-10T18:06:30+5:302022-02-10T18:07:36+5:30
Coronavirus: देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
कोल्हापूर: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Coronavirus) संकट देशभरात घोंगावत आहे. कोरोनामुळे अन्य गोष्टींप्रमाणे मास्क अनिवार्य झाले आहे. मास्कमुळे अनेकांना अनेकविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांमध्ये मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार, अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यावर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यूके, जर्मन, फ्रान्स आदी पाश्चिमात्य देशांनी मास्कमुक्ती केली असून, त्यामागील तंत्र काय आहे. त्याची माहिती संकलित केली जाईल. केंद्र, राज्यातील टास्कफोर्सचा याबाबत सल्ला घेण्यात येईल. कोरोना, ओमायक्रॉनची रुग्णसंख्या कमी होत असल्याने चित्रपटगृहे, रेस्टॉरंट आदींबाबत सध्या असणारे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केले जातील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
आम्ही आमच्यापरिने जमेल तेवढे काम केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना कोरोनाचा प्रसारासाठी महाराष्ट्रासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली. कोरोना पेशंटला प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थानी राज्याचे कौतुक केले. आम्ही आमच्यापरिने जमेल तेवढे काम केले आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक रुग्णालयांनी पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लसींची खरेदी केली. आता मात्र लस एक्सपायरी होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी या लसी घ्याव्यात. त्यांची लस आधी घ्यावी आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात याबाबत केंद्राशी आणि राज्याशी चर्चा करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.