कुपोषित मुलीला न बघताच आरोग्यमंत्र्यांनी गाठली मुंबई

By admin | Published: September 24, 2016 04:04 AM2016-09-24T04:04:16+5:302016-09-24T04:04:16+5:30

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले

Health Minister visits Mumbai after not seeing malnourished girl | कुपोषित मुलीला न बघताच आरोग्यमंत्र्यांनी गाठली मुंबई

कुपोषित मुलीला न बघताच आरोग्यमंत्र्यांनी गाठली मुंबई

Next

अरीफ पटेल,

मनोर- पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले असून राज्यपालांनी या प्रकरणाची दखल घेऊन नुकतीच संबंधित मंत्र्यांची हजेरी घेतली होती. मात्र, कुपोषणामुळे बळी गेलेल्या रोशनीच्या घरी गेलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पालघर तालुक्यातील टेनमोरपाडा येथील कुपोषणग्रस्त सुर्वी सुदाम अत्कारी या सात महिन्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गाडीतून उतरलेही नाहीत. तिला पाहण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या एका डॉक्टरला पाठवले आणि स्वत: मात्र मुंबई गाठली. त्यामुळे आदिवासींमध्ये संतापाची भावना आहे.
आरोग्यमंत्री सध्या कुपोषणाची दखल घेत पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा परिसरात कुपोषिग्रस्तांची पाहणी करीत आहेत. गुरुवारी वाडा येथे त्यांचा दौरा होता. त्यानंतर सायंकाळी ते पालघर तालुक्यातील टेननाका मोरेपाडा येथे राहणाऱ्या सुर्वी या कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या मुलीला पाहण्यासाठी निघाले. तिचे वजन केवळ दोन किलो २०० ग्रॅम आहे.
मात्र, सावंत यांनी आदिवासीपाड्यापर्यंत पोहोचूनही गाडीबाहेर पायही ठेवला नाही. त्यांच्यासोबत आलेले डॉ. धुमाळ यांनी त्या मुलीची तपासणी केली. या वेळी पालघरचे शिवसेनाप्रमुख उत्तम पिंपळे उपस्थित होते.
>चार दिवसांपूर्वी
प्रकृती बिघडली होती
चार दिवसांपूर्वीच सुर्वीची प्रकृती गंभीर झाली होती, त्या वेळी शिवसेनेच्या दिलीप देसाई, वसंत ठाकरे यांनी तिला दुर्वेस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. डॉ. संजय बुरप्लले यांनी तिची तपासणी करून केंद्रात सुविधा नसल्याने रुग्णवाहिका बोलावून तिला डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या आरोग्याबाबतची माहिती सावंत यांना देण्यात आली होती. ती मुलगी आता घरी आहे. तिला भेटण्यासाठीच ते टेननाका येथे आले होते. याबाबत डॉ. धुमाळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी जाऊन त्या मुलीची तपासणी केली. तिची प्रकृती आता बरी आहे. आरोग्यमंत्र्यांना महत्त्वाचा फोन आला, म्हणून ते न उतरता निघून गेले.’ लाल दिव्याची गाडी थांबली असल्याने कोणी तरी मंत्री आला आहे, ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मात्र, गाडी पाड्यावर न जाता फिरून परत गेली.
>बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही-दीपक सावंत
वाडा : राज्याच्या आदिवासी भागांत होणारे बालमृत्यू जाहीर करावेत, बालमृत्यूंची आकडेवारी कोणीही लपवून ठेवू नये, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याने राज्य सरकार कोणत्याही प्रकारे बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी वाड्यात दिली. त्यांनी पेठरांजणी येथील कुपोषणाने दगावलेल्या रोशनी सवरच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पावले उचलली जातील. मुंबईतील नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांसोबत गुरुवारीच बैठक झाली आहे. या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेऊन मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य विभागाच्या यंत्रणेबरोबरच सेवा देतील, असे त्यांनी सांगितले.
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील असून भविष्यात बालमृत्यूचा दर कमी करण्यावर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेना गटनेते नीलेश गंधे, जि.प. सदस्य प्रकाश निकम, गिरीश पाटील, प्रकाश किणी आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
>आरोग्यमंत्री कुपोषणाची बळी ठरलेल्या रोशनीच्या कुटुंबीयांना भेटले, मात्र त्यांनी कुपोषणग्रस्त सुर्वीच्या घरी जाणे टाळले. त्यामुळे नाराजी आहे.

Web Title: Health Minister visits Mumbai after not seeing malnourished girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.