‘आरोग्य सेवा कायदा राज्यात लागू करावा’
By admin | Published: March 15, 2017 04:07 AM2017-03-15T04:07:47+5:302017-03-15T04:07:47+5:30
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि इस्पितळांकडून सामान्य रुग्णांच्या होणाऱ्या लूटमारीला पायबंद करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१०मध्ये संमत केलेला ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि इस्पितळांकडून सामान्य रुग्णांच्या होणाऱ्या लूटमारीला पायबंद करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१०मध्ये संमत केलेला ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना अलीकडेच पत्र लिहिले आहे. या पत्राच्या प्रती सर्व आमदारांनाही पाठविण्यात आल्या आहेत. घनवट पत्रात म्हणतात की, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, सिक्किम राज्यांनी या कायद्याची तत्परतेने अंमलबजावणी केली. परंतु महाराष्ट्रात हा कायदा लागू झालेला नाही. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रास हे कमीपणा आणणारे आहे. हा कायदा लागू झाल्यास प्रत्येक आरोग्यसेवेसाठी तपासणी व उपचार यांचे किमान-समान दर दर्शनी भागात लावणे प्रत्येक चिकित्सालय व रुग्णालयास बंधनकारक ठरेल. (प्रतिनिधी)