आरोग्य, वाहतुकीचा प्रश्न गंभीर
By admin | Published: October 20, 2016 01:16 AM2016-10-20T01:16:23+5:302016-10-20T01:16:23+5:30
प्रभागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही.
चंदननगर : प्रभागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. औषध फवारणी होत नाही. डेंगी, चिकुनगुनियासारख्या रोगांवर प्रतिबंध लावण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही. कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, कचरा उचलणारी वाहने खराब असल्याने कचरा वेळेवर उचलला जात नाही, अशा समस्या नगरसेवकांनी मांडल्या.
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या मासिक सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या तक्रारी मांडल्या. प्रभाग समिती अध्यक्ष महेंद्र पठारे व उपायुक्त वसंत पाटील उपस्थित होते.
प्रभागात डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, बिशप व आरनॉल्ड शाळेसमोे ड्रेनेजचे पाईप पडलेले असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. गणेशनगर मुख्य रस्ता व रामचंद्र सभागृहासमोरील खोदलेला रस्ता दुरूस्त करावा, अशा तक्रारी सभेत मांडण्यात आल्या. आरोग्य फवारणी होत नसल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांच्या नावे खडे फोडण्यात आले. (वार्ताहर)
>मंडई होणार सुरू
वडगावशेरी आनंदपार्क येथील बंद भाजी मंडई सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर उपायुक्त वसंत पाटील म्हणाले, की महात्मा फुले मंडई विभागाशी बोलून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही मंडई पंधरा दिवसांत सुरू करण्यात येईल.