तावडेच्या हजेरीबाबत ३ जानेवारीला सुनावणी
By admin | Published: December 23, 2016 04:44 AM2016-12-23T04:44:23+5:302016-12-23T04:44:23+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला हजर करण्याबाबतच्या
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला हजर करण्याबाबतच्या अर्जावर ३ जानेवारी २०१७ला जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात निर्णय होणार आहे. गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तावडेला न्यायालयात हजर करायचे की नाही, याचा निर्णय बिले यांच्या न्यायालयात ३ जानेवारीला होईल, असे साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणातील सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेला संशयित समीर गायकवाडच्या दोषारोपपत्र निश्चितीवरही ३ जानेवारीलाच सुनावणी होणार आहे.
पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा आहे. ६ डिसेंबर २०१६ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
या दोषारोपपत्रातील माहिती तावडेला सांगण्यासाठी व हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करावा, यासाठी त्याला हजर करण्याचा अर्ज तावडेचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी दाखल केला आहे.
गुरुवारी हजर अर्जाबाबतची सुनावणी एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात झाली. अॅड. पटवर्धन यांनी, तावडेला दोषारोपपत्रातील माहिती सांगायची आहे, त्यासाठी त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी परवानगी द्यावी असा अर्ज यापूर्वी दिल्याचा युक्तिवाद साळुंखे यांच्या न्यायालयात केला. त्यावर साळुंखे यांनी, माझ्याकडे प्रभारी पदभार आहे. तावडेच्या या अर्जाबाबत ३ जानेवारीला निर्णय होईल, असे सांगितले. त्यामुळे तावडेला न्यायालयात हजर करायचे की नाही, याचा निर्णय या दिवशी होणार आहे. (प्रतिनिधी)