११ जणांच्या अपिलावर सुनावणी
By admin | Published: July 16, 2016 03:13 AM2016-07-16T03:13:40+5:302016-07-16T03:13:40+5:30
२००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली.
मुंबई : २००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली. त्याचबरोबर सीबीआयने ११ पैकी तीन जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी केलेल्या अपिलावरही सुनावणी घेण्यात येणार आहे.
२००२ गोध्रा हत्याकाडांनंतर बिल्कीस बानूवर सामुहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने २००८ मध्ये ११ जणांना दोषी ठरवले. या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, यासाठी या सर्वांनी उच्च न्यायालयात अपील केला. तर सीबीआयने ११ आरोपींपैकी तीन जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठापुढे या अपिलांवर सुनावणी होती.
सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने उच्च न्यायालयाने वेणेगावकर यांनाच धारेवर धरले. बिल्कीस बानूच्या कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूचे कारण खंडपीठाने विचारल्यावर अॅड. वेणेगावकर याचे उत्तर देऊ शकले नाहीत. ‘शवविच्छेदन अहवाल गुजराती भाषेत असल्याने आपल्याला ते कारण कळू शकले नाही,’ असे अॅड. वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले.
त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, तुम्ही (वेणेगावकर) असे कसे म्हणू शकता? केसला सुरुवात करताना तुम्हाला याची माहिती करून घ्यायला हवी होती. आता दोन दिवस सुटी आहे तर केसचा नीट अभ्यास करा आणि मगच केसला सुरुवात करा.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २००२ च्या गोध्रा दंगलीनंतर ३ मार्च २००२ रोजी अहमदाबादजवळील राधिकानगर येथे बिल्कीस बानूच्या कुटूंबियांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी बिल्कीस पाच महिन्यांची गरोदर होती. अशा अवस्थेत तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या कुटूंबातील सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
अहमदाबादमध्ये या खटल्यास सुरुवात झाली. मात्र बिल्कीसने साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, अशी भीती बिल्कीसने व्यक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आॅगस्ट २००४ मध्ये हा खटला मुंबई न्यायालयाकडे वर्ग केला.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शैलेश भट या आरोपीने बिल्कीसच्या तीन वर्षाच्या मुलाला खेचून त्याची हत्या केली. तर जसवंतभाई नै, गोविंदभाई नै आणि नरेश मोरधिया यांनी बिल्कीसला एका झाडापर्यंत खेचत नेले आणि तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच आरोपींनी बिल्कीसच्या अन्य नातेवाईकांनाही मारहाण केली.
जसवंतभाई, गोविंधभाई, शैलेश भट, राधेश्याम शहा, बिपीनचंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहानिया, राजुभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदन अशी या ११ आरोपींची नावे आहेत.
त्यापैकी जसवंतभाई, गोविंदभाई आणि राधेश्याम शाह यांनी बिल्कीसवर बलात्कार केल्याने त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी सीबीआयने मागणी केली आहे. (प्रतिनिधी)