अवमान याचिकेची सुनावणी पूर्ण पीठाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 04:54 AM2017-02-23T04:54:26+5:302017-02-23T04:54:26+5:30
कोर्टरूमध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे व्हिडीओ व रेकॉर्डिंग करून न्यायालयाचा
मुंबई : कोर्टरूमध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे व्हिडीओ व रेकॉर्डिंग करून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका बॉम्बे बार असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी पूर्ण पीठापुढे होणे आवश्यक असल्याचे म्हणत, हे प्रकरण पूर्ण पीठाकडे वर्ग केले.
‘ही याचिका पाहता आणि उपलब्ध असलेले पुरावे पाहता, न्यायालयाचा अवमान करण्यात आला आहे, हे स्पष्ट आहे. याचा विपरित परिणाम न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर होणार आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने म्हटले. पूर्ण पीठ म्हणजे, उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश या प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देतील. अवमानची कारवाई करण्यासाठी ही अगदी योग्य केस आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने गुगल व यू-ट्युबला या प्रकरणी नोटीस बजावत, तातडीने कोर्टरूमच्या सुनावणीचा व्हिडीओ काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, बुधवारच्या सुनावणीत गुगलच्या वकिलांनी यू-ट्युबवर गुगलचे नियंत्रण नसल्याचे सांगितले. यू-ट्युब आणि गुगल स्वतंत्र आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही, अशी माहिती गुगलच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)