आमदार रमेश कदमच्या जामीनावर उद्या सुनावणी
By admin | Published: January 16, 2017 05:31 PM2017-01-16T17:31:34+5:302017-01-16T17:31:34+5:30
अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 16 - अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी हा आदेश देण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख ठेवली आहे.
आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातून सुनील सुभाष चव्हाण या नावाने वाहन खरेदीसाठी ११ लाख ७५ हजार ५०० रुपये सोलापूरला पाठविण्यात आले होते तर सुनील चव्हाण याने कर्ज मंजुरीचा कोणताही प्रस्ताव सादर केला नव्हता. ती रक्कम घेऊन सुनील बचुटे याने वाहन खरेदी केले होते. या गुन्हायात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ.रमेश कदम यालाही आरोपी करण्यात आले होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात सोलापुरात आ.रमेश कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. १६ जानेवारी रोजी आ. कदम यांची पोलीस कोठडी संपली होती.त्यामुळे मुंबई पोलिसांनी आ.रमेश कदम यांना सोमवारी दुपारी तीन वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकार पक्षाच्या वतीने अॅड. संतोष पाटील यांनी संबंधित प्रकरणामध्ये आरोपी रमेश कदम याचा मुख्य रोल आहे.त्याच्यावर असलेले गुन्हे अजामीन पात्र व गंभीर स्वरुपाचे आहे. तसेच गुन्ह्याची व्यापती मोठी आहे.ज्या नावाने प्रकरण केले तो सुभाष चव्हाण अस्तित्वातच नाही. या प्रकरणातील मूळ कागदपत्रे जप्त करणे, संबंधित पैसा जनतेचा असल्याने या साऱ्या बाबींच्या तपासासाठी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.
कदम याने स्वत: न्यायालयाकडे आपली बाजू मांडताना माझा प्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नसल्याचे नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद सोमवारी झाला.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी जामीन अर्जावर आदेश देण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख ठेवली आहे.
आमदार कदम रेल्वेने आले
मुंबई पोलिसांनी आथोर जेलमधुन आ.रमेश कदम यास ताब्यात घेतले जामीन अर्जासाठी रमेश कदम यांने केलेल्या सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. म्हणुन मुंबई पोलिसांनी रमेश कदम यास रेल्वेने सोलापूरात आणले. यावेळी मुंबई पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता. यात पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गारगोटे व पाच पोलीस हवालदारांचा समावेश होता.
कार्यकर्त्यांची न्यायालयात गर्दी
न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे रमेश कदम यांच्या जामीन अर्जावार सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. यासाठी रमेश कदम हे सोलापूरात दाखल झाले होते. रमेश कदम मोहोळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असल्याने येथील कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती.