नीरव मोदी बँक गैरव्यवहारप्रकरणाची सुनावणी २९ जूनला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:41 PM2019-06-14T18:41:47+5:302019-06-14T18:48:46+5:30
नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिका-यांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घातला होता.
पुणे : नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिका-यांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घातला होता. त्यानंतर मोदी व कुटुंबीय परदेशात फरार झाले आहेत. या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. दाखल करण्यात आलेल्या दाव्याची पुढील सुनावणी 29 जुन रोजी होणार आहे.
बँकेने या प्रकरणी मुंबई 'डीआरटी-वन'मध्ये वसुली दावा (रिकव्हरी सूट) दाखल केला आहे. मात्र, मुंबईतील या न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची जागा सध्या रिक्त असल्याने औरंगाबाद येथील 'डीआरटी'चाही अतिरिक्त कार्यभार सध्या पुण्यातील पुणे डीआरटी वन या न्यायाधीकरणाकडे सोपविण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेतर्फे या प्रकरणाची सुनावणी पुण्यात घेण्याची विनंती करण्यात आली होती. या कारणास्तव पंजाब नॅशनल बँक विरूद्ध नीरव मोदी प्रकरणाची सुनावणी बुधवारी, १२ जून रोजी पुण्यातील 'डीआरटी'मध्ये पार पडली. या सुनावणीदरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. मोदी यांच्या वतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल २९ जून रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
* पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा तीनशे कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा १७०० कोटी रुपयांचा आहे. बुधवारी पहिल्या व दुस-या म्हणजेच एकूण ७३०० कोटी रुपयांच्या दाव्यांबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला. १७०० कोटी रुपयांच्या तिस-या दाव्याची सुनावणी पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे २९ तारखेला पहिल्या दोन दाव्यांबाबत कर्जवसुली न्यायाधिकरणाचे न्यायाधीश काय निकाल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.