Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी: वकिलांनी तीन व्हिडीओ दाखविले, 2 वाजता निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:58 AM2022-11-15T11:58:14+5:302022-11-15T11:58:37+5:30
Jitendra Awhad Bail Plea: आव्हाड यांचे एकूण तीन व्हिडीओ कोर्टात दाखविण्यात आले. ज्यामध्ये आव्हाड यांनी जाणीवपूर्वक ते केले नाहीय, असा दावा वकिलांनी केला.
भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने लावलेल्या विनयभंगांच्या आरोपांवर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरु आहे. यावर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला गुन्हाची माहिती दिली आहे. यावर आव्हाड यांच्या वकिलांकडूनही युक्तीवाद करण्यात आला आहे.
पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. आरोपी हे राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात, दबावही टाकू शकतात. यापूर्वीच्या प्रकरणात जामीन देताना ज्या अटी शर्थी घातल्या होत्या त्याचे पालन ते करत नाहीएत, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत जामीन अर्जाला विरोध केला आहे.
यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी युक्तीवादाला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी युक्तीवाद केला. वकिलांनी कोर्टासमोर एक व्हिडीओ दाखविला. मुख्यमंत्री ठाण्यात आले होते गर्दी झाली होती. धक्काबुक्की होऊ शकत होती. अर्जदार आव्हाड हे तिथे गर्दीत काही चुकीचं होऊ नये असा प्रयत्न करत होते, असे वकिलांनी म्हटले.
आव्हाड यांचे एकूण तीन व्हिडीओ कोर्टात दाखविण्यात आले. ज्यामध्ये आव्हाड यांनी जाणीवपूर्वक ते केले नाहीय, असा दावा वकिलांनी केला. याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला व्हिडिओ सुद्धा कोर्टात लॅपटॉपवर दाखवण्यात आला. मुख्यमंत्र्यांशी बोलून आव्हाड निघत होते. ते फक्त सीएम नाहीत तर ठाण्याचे नेते आहेत. त्यामुळे लोकांनी गर्दी केलेली होती. तिथून वाट काढत आव्हाड पुढे सरकत होते. यावेळी तक्रारदार तिथे होत्या, तक्रारदार महिलेला बाजूला करण्यापूर्वी आव्हाड यांनी आणखी दोघांना बाजूला केले होते, असे वकिलांनी सांगितले.
आणखी एक व्हिडीओ...
11 दिवसांपूर्वी छटपूजेच्या कार्यक्रमात तक्रारदार महिला आणि जितेंद्र आव्हाड एकाच व्यासपीठावर होते. तेव्हा त्यांनी संबंधित महिलेचा बहीण म्हणून उल्लेख केला होता. ''हमारी बहन मुंबई से आयी है'', असे आव्हाड तक्रारदार महिलेला म्हणताना दिसत असल्याचा व्हिडीओ देखील कोर्टात दाखविण्यात आला.