पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

By admin | Published: April 21, 2016 02:25 AM2016-04-21T02:25:58+5:302016-04-21T02:25:58+5:30

पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने

Heart attack shock | पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

Next

डोंबिवली : पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. चिवलकर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे सुशिक्षितांच्या या सांस्कृतिकनगरीत कसे संघर्षाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत, त्याचे हे हिमनगाचे टोक आहे.
भीषण पाणीकपातीमुळे सध्या डोंबिवलीत सगळीकडे टंचाई आहे. पेंडसेनगरात अन्य काही विभागांच्या तुलनेत बरी परिस्थिती असली तरी सोसायटीच्या एकाच विंगला पाणी आले नाही. त्यामुळे काही सभासद रात्रीच्यावेळी सोसायटी अध्यक्ष चिवलकर यांना जाब विचारायला गेले. त्याचा धसका चिवलकर यांनी घेतला व त्यांनाहृदयविकाराचा झटका आला. चिवलकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २१ एप्रिल रोजी त्यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शहराच्या पूर्व भागातील पेंडसेनगरातील विजयस्मृती सोसायटीत जवळपास २५० सदनिका आहेत. सात विंग आहेत. सोसायटीचे अध्यक्ष चिवलकर हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वय ५५ वर्षे आहे. चिवलकर हे सौम्य प्रकृतीचे गृहस्थ असून एकाच विंगला कमी दाबाने पाणी आले, त्याचा चढ्या आवाजात व तिखट भाषेत जाब विचारण्यात आल्याने तेअस्वस्थ झाले. अशी दमदाटीची भाषा ऐकण्याची सवय नसल्याने चिवलकर यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना त्यांचा मुलगा व पत्नीने तातडीने डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिवलकर यांच्या मुलाने पुढील उपचारासाठी वडिलांना मुलुंडच्या एका बड्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिवलकर यांच्यावरील शस्त्रक्रियेचा लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकरणी चिवलकर यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.
सकाळी व सायंकाळी कष्टाचा लोकल प्रवास करून घरी परतलेल्या डोंबिवलीकराला पाणी न आल्याची भुणभुण ऐकायला मिळाली की, त्याचे माथे भडकते. त्यामुळे पाणीटंचाईने अनेक घरांत व पर्यायाने सोसायट्यांमध्ये संघर्षाचे सुरुंग पेरण्यास सुरुवात केली आहे. पुढील किमान दोन महिने या टंचाईला तोंड द्यायचे असल्याने या शहरातील सफेद कॉलर मंडळी एकमेकांची कॉलर पकडून मारामाऱ्या करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी पालिका व पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
या सगळ्या प्रकाराची कल्याण-डोंबिवली महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पाणीगळती, चोरी व नादुरुस्त पाइपलाइन यामुळे वाया जाणारे पाणी जर महापालिकेने वाचवले तरी सोसायट्यांमधील असे समरप्रसंग टळतील, अशी भावना स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Heart attack shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.